Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
Mumbai Road Accident: मुंबईतील सागरी किनारा महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये कारमध्ये बसलेल्या 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. ही तरुणी मूळची नाशिकची होती.

Mumbai Coastal Road: मुंबईतील बहुचर्चित सागरी किनारा मार्गावर (Mumbai Coastal Road) शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तिच्यासोबत गाडीत असणारा मित्र गंभीररित्या जखमी झाला आहे. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी गार्गी चाटे (वय 19) आणि तिचा मित्र संयम साकला हे दोघे त्यांच्या स्विफ्ट कारने प्रभादेवी येथून मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. संयम साकला हा गाडी चालवत होता. हाजी अलीच्या वळणावर संयम साकला याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार लोखंडी रेलिंगला धडकली. ही कार इतकी वेगात होती की, कोस्टल रोडवरील लोखंडी रेलिंगला धडकल्यानंतरही कार दोनदा पलटी झाली. गार्गी चाटे ही मूळची नाशिकच्या गंगापूर येथील रहिवासी होती. ती दक्षिण मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती सध्या प्रभादेवी परिसरात वास्तव्याला होती.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, कोस्टल रोडवरुन जाणाऱ्या काही वाहन चालकांनी गार्गी चाटे आणि संयम साकला यांना गाडीतून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार लोखंडी रेलिंगला धडकून पलटी झाल्यामुळे गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच गार्गीचा मृत्यू झाला. तर संयम साकला याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
ताडदेव पोलिसांकडून हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास केला जात आहे. त्यासाठी कोस्टल रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कार चालवणारा संयम साकला सीएचे शिक्षण घेत होता. अपघातावेळी कार वेगात असल्याने त्याने मद्यप्राशन केले होते का, अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र, पोलिसांनी संयम साकला याने मद्यप्राशन केले नव्हते, असा निर्वाळा दिला आहे.
दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी झालेल्या अपघातात रशीद सुलतान शेख या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडून ठाण्यात दुचाकी चालक धवल वैदय याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री धवल हा दुचाकीने मेट्रो सिनेमाहून महापालिका मार्गे सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने भरधाव वेगात येत होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या दुचाकीने रशीद शेख यांना धडक दिली.
या अपघातात जखमी झालेल्या रशीदला उपचारासाठी जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रशीदचा मृत्यू झाला. या प्रकरणी आझद मैदान पोलिस ठाण्यात धवल वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात धवलही जखमी झाला असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

