Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; 2019 मध्ये पहिल्यांदाच आमदार, मंगलप्रभात लोढांनाही टाकले मागे
BJP Candidate Parag Shah Wealth: भाजपचे उमेदवार पराग शाह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे.
BJP Candidate Parag Shah Wealth: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
राज्यातील विविध पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये घाटकोपर पूर्वमधील (Ghatkoper East Vidhan Sabha ) भाजपचे उमेदवार पराग शाह (Parag Shah) महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये घाटकोपर पूर्वमधून प्रथमच विजयी झालेल्या पराग शाह यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पराग शाह गेल्या वेळी 53,319 मतांनी विजयी झाले होते. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शाह यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांची एकूण संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे.
पराग शाह यांची 5 वर्षांपूर्वी किती संपत्ती होती?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराग शाह यांनी आपली संपत्ती 550.62 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत. पराग शाह महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराग शाह हे 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 132 मधून विजयी झाले होते.
मी 50 टक्के रक्कम दान करतो- पराग शाह
दरम्यान, मी 50 टक्के रक्कम दान करतो, असा दावा पराग शाह यांनी केला आहे. अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मला त्याचा चांगला वापर करायचा आहे. देवाने मला सर्व काही दिले आहे, देशाने मला सर्व काही दिले आहे, त्यामुळे मीही काहीतरी दिले पाहिजे, असं मला वाटतं. मी एक नेता, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ताही आहे. मी माझ्या बचतीच्या 50 टक्क्यांहून अधिक समाजसेवेसाठी देतो, असं पराग शाह यांनी सांगितले.
मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती किती?
दक्षिण मुंबईतील विद्यामान आमदार आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील दक्षिण मुंबईतील भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी देखील प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या 436 कोटी 80 लाख 48 हजार 591 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोढा यांच्यावर सध्या 182.93 कोटी रुपयांचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर 123.28 कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण 123 कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.