Amit Thackeray: राज ठाकरेंचा 'छावा'; माहीमच्या नवनिर्माणाची आस घेऊन पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरेंची संपत्ती किती?
Amit Thackeray Net Worth: माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.
Amit Thackeray Wealth मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरेंनी काल उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अमित ठाकरेंसोबत राज ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, आई शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.
माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. अमित ठाकरेंची एकूण १३.८३ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ४.१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. अमित ठाकरेंच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्यावर १.७२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अमित ठाकरेंकडे मोठ्या प्रमाणात ठेवी, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरेंचा व्यवसाय ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही-
अमित ठाकरेंकडे सध्याच्या घडीला १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये इतकी रक्कम आहे. ६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर शेअर्स ३ कोटी ९८ लाख रुपयांचे आहेत. तसेच अमित ठाकरेंची पोस्ट खात्यात 20 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे 3 तोळे सोने आहेत.
पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे किती संपत्ती?
पत्नी मिताली ठाकरेंच्या नावे – १ कोटी ७२ लाख
एकूण जंगम मालमत्ता – ५८ लाख ३८ हजार ५८७
ठेवी- ५ कोटी ९३ लाख
म्युचूअल फंड -५२ लाख
सोने -९ तोळे
मुलाच्या नावावर ७० हजार
मुलाच्या नावे म्युच्यूअल फंड – ६० लाख
तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी
सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स
व्यवसाय-ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह
सदा सरवणकर यांचा उमेदवारी मागे घेण्यास नकार-
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे.