North West Lok Sabha: वडिलांची उणीव जाणवली, प्रचार करताना दमछाक, पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी साथ दिली; मतदानाला निघताना अमोल कीर्तिकरांनी मनातील भावना बोलून दाखवल्या
Mumbai Voting Lok Sabha: मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत. अमोल कीर्तिकर यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क.
![North West Lok Sabha: वडिलांची उणीव जाणवली, प्रचार करताना दमछाक, पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी साथ दिली; मतदानाला निघताना अमोल कीर्तिकरांनी मनातील भावना बोलून दाखवल्या North West Lok Sabha constituency Amol Kirtikar before Voting says I feel lack of Fathers presence during Lok Sabha Campaign North West Lok Sabha: वडिलांची उणीव जाणवली, प्रचार करताना दमछाक, पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी साथ दिली; मतदानाला निघताना अमोल कीर्तिकरांनी मनातील भावना बोलून दाखवल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/83462bfc2732f9f4095d69de161597001716173401426954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत आहे. आज मतदानाला निघण्यापूर्वी अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. त्यानंतर कीर्तिकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आपल्याला वडिलांची उणीव जाणवल्याची कबुली दिली. पण मविआतील घटकपक्षांमधील सहकाऱ्यांनी साथ दिल्याने सर्वकाही शक्य झाले, असे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरातील राजकारण पूर्णपणे वेगळे होते. मी राजकारणात आल्यापासून दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, असे वातावरण कधीही पाहिले नव्हते. बरेच लोक आम्हाला सोडून गेले, पण वस्तुस्थिती स्वीकारणे गरजेचे होते. त्यामुळे जे सोबत होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केल्याचे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले.
एकट्याने प्रचार करताना दमछाक
गेल्या तीन टर्मपासून माझे वडील गजानन कीर्तिकर हे वायव्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते. तेव्हा ते उमेदवार म्हणून जबाबदारी सांभाळायचे तर मी त्यांना बॅक सपोर्ट द्यायचो. यावेळी दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पडत होतो. त्यामुळे नक्कीच माझा दमछाक झाली. पण वडील सोबत नसले तरी त्यांच्या अनुभवाचे, मायेचे, मविआतील घटकपक्षाचे लोक माझ्या मागे उभे राहिले होते. त्यामुळे विजय आमचाच होणार आहे, असं अमोल कीर्तिकर म्हणाले.
यावेळी अमोल कीर्तिकर यांना लोकसभेच्या प्रचाराच्या काळात वडिलांशी तुमची काय चर्चा झाली, त्यांनी तुम्हाला काही सल्ला दिला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमोल कीर्तिकर यांनी म्हटले की, घरी आमच्या राजकीय चर्चा होत नाहीत. आजही ते उशिरा ते मतदान केंद्रावर जाणार आहेत. 100 टक्के गजानन कीर्तिकर यांची उणीव भासली. एखादी व्यक्ती अनेक वर्ष काम करत असते, ती अचानक विरोधात गेल्यावर अडचण होते. मात्र, वडिलांची उणीव भरुन काढण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी केले. माझ्यासोबत असलेल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन प्रचार केल्याचं अमोल कीर्तिकर म्हणाले. मी नेहमी सांगतो की वडील आणि मुलगा, आई आणि मुलगा हे नातं वेगळं असतं. तुम्ही कितीही काही करता, आई वडिलांचं मुलांवर प्रेम असतं, तुम्ही दाखवा अथवा नका दाखवू, ते निसर्गानं दिलेलं आहे आणि हिंदू संस्कृतीनं पण दिलं आहे, असेही अमोल कीर्तिकर यांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)