''कोणी माईचा लाल नाही...''; मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारल्यानंतर संतापले सरकारचे मंत्री
दक्षिण मुंबईतील गिरगांव भागाची ओळख चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसासाठी आहे. त्याच मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील एका नोकरीसंदर्भातली जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे
जळगाव : संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारून मुंबईसह (Mumbai) स्वतंत्र महाराष्ट्र मिळवण्यासाठी 104 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. मात्र, देशाची राजधानी असलेल्य याच मुंबईत मराठी माणसांन नोकरी नाकारण्यात येत असल्यावरुन संताप व्यक्त होत आहे. राज्यात शिंदे-फडणवी-पवार यांचं सरकार आहे, शिवसेना म्हणजे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना. मात्र, तरीही मराठी (Marathi) माणसाला मुंबईत नोकरी नाकारण्यात येत असल्यावरुन खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. शिंदेची नकली व बुळचट शिवसेना (Shivsena) असल्याचं राऊत यांनी म्हटलं. आता, नोकरी नाकारण्याच्या या मुद्द्यावर सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचा माईका लाल मराठी माणसाला नोकरी नाकारू शकत नाही, असे पाटील यांनी म्हटले.
दक्षिण मुंबईतील गिरगांव भागाची ओळख चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसासाठी आहे. त्याच मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील एका नोकरीसंदर्भातली जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये मराठी माणसाने अर्ज करु नये, असं वाक्य धडधडीत जाहिरातीवर नमूद करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर संबंधित कंपनीच्या एच.आर. विभागाने जाहिरात डिलीट करुन माफीही मागितली आहे. मात्र, यावरुन आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघात जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराला वेग आला असून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आमचा बालेकिल्ला आहे, तो आबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी, पत्रकारांनी मुंबईतील नोकरीच्या जाहिरातीसंदर्भात प्रश्न विचारल होता. त्यावरही, त्यांनी गुलाबराव पाटीलस्टाईल प्रतिक्रिया दिली आहे. ''मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही, असा कोणी माईचा लाल नाही. मुंबईत 80 टक्के नोकरीचा अधिकार पहिले स्थानिकांना असतो'', असे पाटील यांनी म्हटले आहे.
पवारांच्या सभांचा फरक नाही
शरद पवार यांच्या सभांचा फारसा फरक पडणार नसून प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, आम्ही आतापर्यंत फर्स्टक्लासनेच पास झालो आहे. तर, करण पवार ईव्हीएम मशीन बद्दल आता बोलत आहेत. मात्र, ईव्हीएम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं असून हा त्यांचा रडीचा डाव आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
राऊतांवर टीका, उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया
गुजरातच्या चोरांनी शिवसेना फोडण्याच्या प्रयत्न केल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, संजय राऊत ही वाया गेलेली केस आहे, असे म्हटले. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी वर टीका करताना म्हटले होते की नरेंद्र मोदी हे दुर्दैवी पंतप्रधान आहेत. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. हे त्यांचं व्यक्तिगत मत असून लोकांनी मान्य केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, असे बोलणे उचित नाही, असे पाटील यांनी म्हटले.
आव्हाडांना पलटवार
जितेंद्र आव्हाड यांनी नरेश म्हस्के यांच्यावर टीका करताना म्हटले होते एक गद्दार हा राजन विचारे यांच्यासमोर उभा आहे. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिय देतान, जितेंद्र आव्हाड यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, नरेश म्हस्के हे शिवसैनिक आहेत, असे म्हटले. दरम्यान, काही शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत नाहीत, काही भाजपचे कार्यकर्ते काम करत नाही. मात्र, मी असं म्हटलं आहे, कोणी काम करो न करो मात्र शिवसैनिक हा काम करत राहील, असे म्हणत स्थानिक भाजपा पदाधिकऱ्यांवरही गुलाबराव पाटील यांनी मत मांडलं.