'आता माझ्या लग्नाचं बघा!' परळीत शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवाराला तरुणाचा फोन, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर Viral
परळी मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ अशा अजब आश्वासनानं लक्ष वेधून घेतलं होतं.
Beed: 'मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न लावून देईन' असं आश्वासन देत परळीत विधानसभेत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुखांना आता तरुणांचे फोन येत आहेत. 'साहेब माझ्या लग्नाचं बघा.. तुम्ही म्हणला होतात..' अशी विनंती करतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये युवक आम्ही तुम्हाला मतदान केले. आता आमच्या लग्नाचे बघा अशी विनंती करतोय. या युवकाशी संवाद साधताना देशमुख यांनीदेखील त्याला दिलदारपणे उत्तर दिल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी परळी मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ अशा अजब आश्वासनानं लक्ष वेधून घेतलं होतं. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आमदार झाले. यात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख पराभूत झाले.
साहेब माझ्या लग्नाचं बघा! Audio व्हायरल
प्रचाराच्या रणधुमाळीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत एका तरुणानं राजेसाहेब देशमुख यांना फोन करून माझ्या लग्नाचं काय झालं असा सवाल केला. आम्ही आशेनं तुम्हाला मतदान केलं, आता मी २७ वर्षांचा आहे मला परत म्हातारं झाल्यावंर कोण पोरगी देणार असा सवाल करत आता आत्महत्याच करायची पाळी आल्याचं सांगितलं. त्यावर आमदार झाल्यावर पूर्ण करणार होतो. काय पाडलं तुम्ही आता कशाचं लग्न होतंय असं देशमुख म्हणाले. आलो असतो तर कामाला आलो असतो. तुमच्या आशा आता ठेवा. मी असेपर्यंत आत्महत्या करू नका. चिंता करू नका मी आहे. असं उत्तर राजेसाहेब देशमुखांनी या तरुणाला दिलं. या ऑडिओची सध्या मतदारसंघात एकच चर्चा असल्याचं दिसून येतंय.
आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न!
परळीत आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार गटाचे परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी अजब आश्वासनं देत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणाले, तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का विचारतात. सरकारच देत नाही तर कशी लागणार..काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळं सगळ्या पोरांचं लग्न होणं अवघड झालंय. त्यामुळं सगळ्या पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ असं अजब आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी केलंय. बाबूराव तुमचं लग्न करायचंय..त्यामुळं आगे बढो म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं म्हणताच मतदारांमध्येही हशा पिकला होता. तरुण पोरांना काम मिळवून देणार असं आश्वासनही त्यांनी केले.