(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्री गुलाबराव पाटलांना शह देण्यासाठी गुलाबराव देवकरांची जोरदार फिल्डिंग; तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला, जागेचा तिढा सुटणार?
Gulabrao Deokar : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात जागेचा तिढा सोडविण्यासाठीचा चंगा बांधला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते तातडीने शरद पवारांची भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहे.
जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. त्या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकिटासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात जागेचा तिढा सोडविण्यासाठीचा चंगा बांधला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकर तातडीने मुंबईकडे रवाना झाले असून सध्या त्यांची मुंबईवारी ही राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात जागेचा तिढा सुटणार?
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी गेली पाच वर्षापासून माजी मंत्री गुलाबराव देवकर हे तयारी करीत आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असल्याने आणि त्यावर निवडणूक लढविण्यासाठी ते ठाम असल्याने, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी गुलाबराव देवकर हे तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबई येथे रवाना झाल्याची निकट वार्तियांकडून माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी पक्षाला जळगाव ग्रामीणची जागा मिळाली नाही तर गुलाबराव देवकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडून लढतील का? अशा स्वरूपाच्या चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगल्या आहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आता गुलाबराव देवकर कोणत्या पक्षातून लढतात याची उत्सुकता वाढली आहे.
शिरीष चौधरी यांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू
मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्या विरोधात बड्या नेत्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. 2019 च्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळून सुद्धा पराभव पत्करावा लागलेल्या अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) यांनी 2024 ची निवडणूक मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनिल पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2014 साली देशात पंतप्रधान मोदी यांची लाट असताना ही अमळनेर येथील शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढून सुधा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत राहून 2019 ची निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढविली होती. यावेळी मात्र त्यांचा मंत्री अनिल पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवाचे उत्तर देण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्य असताना ही भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष निवडणूक लढवून मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा