NCP Pawar Camp Meeting : शरद पवार गटाची आज दुपारी बैठक; पवारांचा दौरा, पक्ष चिन्ह आणि प्रतिज्ञापत्रांची सद्यस्थिती या विषयांवर चर्चा होणार
NCP Pawar Camp Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
NCP Pawar Camp Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पवार गटाची (Pawar Camp) आज (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील (Mumbai) वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सुरु होणारा शरद पवार यांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची सद्यपरिस्थिती या विषयावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे युवकचे पदाधिकारी आमदार रोहित पवार हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत.
बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पडून महिना झाला आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष चिन्ह गेलं तर काय करायचं, ते कोणतं असावं या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. यासोबतच शरद पवार 15 ऑगस्टनंतर महाराष्ट्र दौरा करणार आहे. बीड, उस्मानाबादमधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्याचं नियोजन कसं असावं याबाबतही माहिती घेतली जाणार आहे. त्याआधी रोहित पवार हे 9 ऑगस्टपासून दौरा सुरु करणार असून पुढे जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर शद पवार त्या त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय शरद पवार याच्या आगामी कार्यक्रमांबाबत, दौऱ्याबाबत देखील चर्चा होणार आहे. सध्या शरद पवार गटाला जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र भरुन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करायची आहेत. याची सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक
दरम्यान एकीकडे शरद पवार गटाची बैठक होत असताना त्याआधी आज (5 ॲागस्ट) दुपारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांची देखील बैठक होणार आहे. आज दुपारी 12 वाजता मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते उपस्थितीत राहणार आहेत. बैठकीत विरोधकांची आघाडी इंडिया (INDIA) महाविकास आघाडीच्या आगामी रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि आमदार भाजपसोबत गेले आहेत. मात्र, शरद पवार मविआसोबत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. शरद पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी अनेकांची भूमिका होती. शरद पवारांच्या उपस्थितीतवर ठाकरे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे या बैठकीद्वारे शरद पवार मविआ नेत्यांची नाराजी दूर करतील, असं म्हटलं जात आहे.