ज्या कारणामुळं शिंदेंनी वेगळी चूल मांडली, त्याच कारणानं आता अजित पवार गट अस्वस्थ; निधी मिळत नसल्याचा आरोप
Maharashtra Politics: येत्या 21 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. नियमित दर मंगळवार आठवडा आमदार बैठक होणार आहे.
Maharashtra Politics: आधी शिवसेनेतील (Shiv Sena) बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली. अशातच ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी भाजपसोबत विराजमान झाले. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच सर्वकाही आलबेल असल्याची वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदार करतायत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचबाबत राजकीय वर्तुळात अजित पवार गट सध्या नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही नाराजी निधीवाटपावरुन सुरू असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे.
21 नोव्हेंबरला अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक
येत्या 21 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. नियमित दर मंगळवार आठवडा आमदार बैठक होणार आहे. मागील तीन आठवडे अजित पवार मात्र या बैठकीस उपस्थितीत नव्हतं. अजित पवार गटात विकास निधी वाटपावरुन नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरच या बैठकीत चर्चा होणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांच्या देवगिरी बंगला येथे 21 तारखेला मंगळवारी बैठक पार पडणार आहे.
अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. निधी वाटपात आमदारांना योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचं नगरविकास, सामजिक न्याय या खात्यांसह रोजगार हमी, मृदू आणि जलसंधारण, अल्पसंख्याक, ग्रामविकास खात्यांबाबतही अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना कमी निधी मिळत असल्याचा आरोप, अजित पवार गटातील आमदारांनी केला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिंदेंच्या आमदारांनी केलेली अजित पवारांवर दुजाभावाची तक्रार
शिवसेनेतील प्रबळ नेते असलेल्या एकनाथ शिंदेंनी बंडल केलं आणि राज्याचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालं. ठाकरेंची साथ सोडून शिंदे भाजपशी हातमिळवणी करत सत्तेज विराजमान झाले. तेव्हा शिंदेंसह गेलेल्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडण्याचं सर्वात मोठं कारण महाविकास आघाडी असल्याचं सांगितलं होतं. तसेच, महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरुन होत असलेला दुजाभाव हे सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं शिंदे गटातील आमदारांनी सांगितलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार निधीवाटप करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमध्ये आता मागचीच वेळ पुढे आलीये, फक्त पात्र वेगळी आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.