NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होत असताना महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून नेतेमंडळींच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे, कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाची विकेट पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील 5 दिवसांत राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. त्यातच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एका हायप्रोफाईल अधिकाऱ्याची एन्ट्री होणार असल्याचे वृत्त आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील चर्चित माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता महायुतीकडून निवडणूक लढवणार आहेत. पुढच्या दोन दिवसात समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. यासंदर्भात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले (Bharat gogavale) यांनी एका वाक्यात उत्तर दिलय.
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे. क्रांती रेडकर यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता त्यांनी ही बातमी खरी असल्याचं सांगत लवकरच पक्षप्रवेशाबाबत निर्णय होईल असं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांचा शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश होणार असल्याच्या वृत्तावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी याबाबत उघडपणे माहिती देण्याचं टाळलं. समीर वानखेडे यांच्या पक्षप्रवेश आणि उमेदवारीबाबत आपल्याला वस्तुस्थिती माहित नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतील, असे एका वाक्यात गोगावले यांनी उत्तर दिलंय.
मुंबईतून लढणार की गावातून
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी तयारीदेखील सुरु झाली आहे. यामध्ये चर्चित समीर वानखेडे यांचंही नाव समोर येत आहे. समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात यासंदर्भात मोठी निर्णय होईल आणि लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, असं क्रांती रेडकर हिने सांगितलं आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा समीर वानखेडे माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत. तसेच, ते त्यांचे मूळ गाव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार की मुंबईतून याचीही चर्चा होत आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वानखेडे चर्चेत
समीर वानखेडे मुंबईतून महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. समीर वानखेडे सध्या चेन्नईमध्ये एनसीबी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक होते, त्यानंतर त्यांचं चेन्नईमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं.
हेही वाचा
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी