Sanjay Raut: २५ लाखांचा पेन, १५ लाखांचा सूट वापरणारे पंतप्रधान मोदी गरिबीचं ढोंग करतात: संजय राऊत
Sanjay Raut: पंतप्रधान मोदी २० हजार कोटींच्या विमानातून फिरतात. त्यांचा एकही मित्र चहा विकणार नाही, सर्वजण अब्जाधीश आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला की, सामान्य जनतेत जाताना साधी राहणी ठेवा. महागडी घड्याळे आणि गाड्यांचा वापर करु नका. पण जे.पी. नड्डांचा हा सल्ला पंतप्रधान मोदींना लागू होतो. पंतप्रधान मोदी (PM Modi) खिशाला जे पेन लावतात ते २५ लाखांचे आहे. त्यांचा सूट १५ लाखांचा आहे. हा मोदींचा सगळा थाट श्रीमंती आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाने इतकी श्रीमंती भोगली नव्हती, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
भाजपच्या १०० टक्के नेत्यांच्या हातात महागडी घड्याळे आहेत. तर ९० टक्के नेते आणि कार्यकर्ते अलिशान गाड्यांमधून फिरतात. पण महाराष्ट्रच नव्हे तर देशातील जनतेने ठरवले आहे की, यांचे महागडे सूट आणि यांच्या हातातील महागडी घड्याळं उतरवायची, अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजपच्या काळात ७००० कोटीचा इलेक्टोरल बाँडसचा घोटाळा झाला. पीएम केअर फंडमध्ये घोटाळा झाला. त्यामुळे जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन ज्ञान पाजळू नये, असे राऊत यांनी म्हटले.
भाजपच्या बापाचा पत्ता आहे का; संजय राऊतांची बोचरी टीका
कोणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपच्या बापाचा पत्ता आहे का? भाजपला आता 10 बाप झाले आहेत. त्यांना खोकेवाले बाप घेऊन राजकारण करावे लागते. एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे बाप आहेत. शिवसेनेचा एकच बाप आहे, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे आम्ही निर्भयपणे लोकांसमोर जातो. आमच्या नेत्यांची भाषणं सुरु असताना लोकं मध्येच उठून बिर्याणी खायला जात नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राचा सौदा करायला निघाले आहेत: संजय राऊत
राज्यातील महानंद दुग्धसंस्थेचा कारभार आता गुजरातमधून चालवला जाणार आहे. महानंदाचे चेअरमन हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेव्हणे होते. हे राज्य सरकार एक डेअरी चालवू शकत नाहीत. पण शुगर लॉबीच्या सर्व लोकांच्या डेअरी व्यवस्थित सुरु आहेत. महानंदा डेअरीची गोरेगाव येथील मोक्याच्या जागेवरील ५० कोटीची जमीन विकण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. ही जमीन अदानींना देण्याचा डाव आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुंबईचा सौदा करायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील असूनही हे लोक राज्यातील संस्था गुजरातमध्ये जाण्याला विरोध करत नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
आणखी वाचा
मोदी 2024 मध्ये पंतप्रधान होणार नाहीत, भाजप 230 चा आकडा ओलांडणार नाही: संजय राऊत