मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांनी जाहीर माफी मागितली!
PM Narendra Modi Solapur Visit Today : आडम मास्तरांनी चूक लक्षात येताच तात्काळ माफी मागितली आणि चूक सुधारली.
PM Narendra Modi Solapur Visit Today : पतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलतांना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. मात्र, आपली चुकी लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदी सभास्थळी दाखल झाले असून, कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी मंचावर आडम मास्तर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र, आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करताना आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. आडम मास्तरांनी चूक लक्षात येताच तात्काळ माफी मागितली आणि चूक सुधारली. मात्र, त्यांच्या या वाक्याची सभास्थळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
उद्धव ठाकरेंचं नाव माझ्या तोंडात...
कार्यक्रमाच्या सुरवातीला पहिले भाषण आडम मास्तर यांचे झाले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांची नावं घेतली. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. पण काही क्षणात त्यांना आपली चूक लक्षात आली त्यांनी माफी मागितली. दरम्यान, यावर खुलासा देखील त्यांनी केला.'देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नेहमी तोंडात येत असल्याने माझ्या तोंडात त्यांचे नावं बसले आहेत,' असे आडम मास्तर म्हणाले.
मोदींच्या हस्ते उद्घाटन, आम्हाला आनंद होतोय
पुढे बोलतांना आडम मास्तर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2019 ला याच सोलापुरात नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचे भूमिपूजन केले होते. आज आम्हाला आनंद होतोय की, त्यांच्याच हाताने या कार्यक्रमाचे उद्घाटन होत असल्याचे आडम मास्तर म्हणाले.
22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार : मोदी
दरम्यान याचवेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होईल, असे मोदी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
कंठ दाटला, आवंढा गिळला; लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, सोलापुरात मोदी भावूक