नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल; कुटुंबीयांनी दिली वेगळीच माहिती, जिल्ह्यात चर्चा
नागपूर येथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी संध्याकाळी 5 वाजता समृद्धी महामार्गाने वाडेगावात आले होते.
बुलढाणा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे टीकेचे धनी बनले आहेत. एका गावात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याने हाता-पाण्याने धुतले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) सारवासारव करण्यात येत आहे. त्यातच, नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे. तसेच, विजय गुरव नेमका कोठे गेला, असा प्रश्ना काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.
नागपूर येथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी संध्याकाळी 5 वाजता समृद्धी महामार्गाने वाडेगावात आले होते. वाडेगावात 6.30 वाजता नाना पटोलेंचा वाढदिवस आणि लोकसभा निवडणुकांतील यशासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून नानांची लाडुतूला करण्याचा कार्यक्रम होता. नियोजित कार्यक्रमानुसार नानांनी कार्यक्रमानंतर 7.30 वाजता भाषण संपवून ते वाडेगावातील नानासाहेब चिंचाळकर विद्यालयाच्या मैदानात थांबलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला गेले होते.
अनवाणी पायांनी मैदानात गेले होते नाना
मैदानात पावसामुळे मोठा चिखल असल्याने नाना हे पालखी असलेल्या मैदानात अनवाणी दर्शनाला आले होते. येथील पालखीचे दर्शन संपवून नाना पटोले आपल्या गाडीकडे गेले असता, गाडीजवळ विजय गुरव या शेगावातील कार्यकर्त्याने नानांचे चिखलात माखलेले पाय आपल्या हाताने धुतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे. तर, काँग्रेसलही लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे, काँग्रेसकडून हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले जात आहे. त्यातच, नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल असल्याने तालुक्यात चर्च रंगली आहे.
फोन नॉट रिचेबल, कुटुंबीय म्हणतात...
एका कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी नाना पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलं. याप्रकरणामुळे काँग्रेस बॅक फूटवर गेल्याने नेत्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे शेगाव येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना यासंबंधी न बोलण्याची नेत्यांनी तंबी देण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव हा सकाळपासून नॉट रीचेबल आहे. यासंदर्भात विजय गुरव यांच्या शेगाव जवळील कालखेड गावी जाऊन चौकशी केली असता ते बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वर्षा गुरव यांनी दिली. त्यामुळे, विजय गुरव नेमके कोठे गेले आहेत, व त्यांचा फोन कशामुळे नॉट रिचेबल आहे, याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी भाजप नेत्यांकडूनही असाच प्रकार
अकोला जिल्ह्यातील वाडेगावात नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका काँग्रेस कार्यकर्त्याने धुवून दिले होते. या कृतीवरून राज्यभरात नाना पटोलेंवर राज्यभरात विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. मात्र, अशीच घटना सात वर्षांपूर्वी अकोल्यातच घडली होती. 25 मे 2017 रोजी अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे गावात भाजप नेत्यांनी आपले पाय शेतकऱ्यांकडून धुवून घेतल्याचा प्रकार घडला होता. भाजपच्या दीनदयाल उपाध्याय शेतकरी संवाद यात्रेदरम्यान हा प्रकार घडला होता. भाजपचे तत्कालिन खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन संघटनमंत्री रवी भुसारी आणि आमदार रणधीर सावरकर यांचे पाय यावेळी शेतकऱ्यांनी धुतले होते. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीही आनंदाने ह्या प्रकाराला विरोध न करता स्वत:चे पाय धूवून घेतले होते. काँग्रेससह विरोधकांनी या प्रकारावर तेंव्हा मोठी टीका केली होती. भाजपचे संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांना पक्ष आणि संघाकडे स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं पद गेलं होतं.
नानांनी स्वत:ला संत व कार्यकर्त्यांना नोकर समजू नये
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहण्यात आला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणे, हा कार्यकर्त्यांचा एकप्रकारे अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतः ला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये, अशी बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केली आहे.