देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, नाना पटोले यांचा भाकीत
नेपाळमधील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा मृत्यू झालेला असताना थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
Navi Mumbai: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून महायुतीमध्ये महाभारत चालला आहे. फडणवीस यांनी हात वर केलाय. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता असल्याचं भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. आज जळगाव जिल्ह्यात पंतप्रधानांची हजेरी आहे. नेपाळमधील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा मृत्यू झालेला असताना थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
काय म्हणाले नाना पटोले?
निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात बसतो असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केलीये. महायुतीमध्ये महाभारत चाललं असल्याचं म्हणत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत महाविकास आघाडीत गडबड होण्याचे भाकीत केलं आहे. ते म्हणाले, महायुतीमध्ये महाभारत चालला आहे. फडणवीस यांनी हात वर केलाय. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत. असं ते म्हणाले.
सर्वात संवेदनहीन पंतप्रधान या देशानं पाहिला
नेपाळमध्ये तीर्थक्षेत्रासाठी गेलेल्या जळगाव मधील नागरिकांच्या मृत्यूनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बोट ठेवले. ते म्हणाले, थोडीशी भावना, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे ते उत्साह साजरा करत आहेत. सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिला आहे. हा कार्यक्रम जनतेच्या पैशाने होतोय. शासकीय कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्राचे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन मीठ चोळत आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.
महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून निवडणुका आता कधी लागतील हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्याच कार्यालयात बसतो अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. लाल किल्ल्यावरून म्हणत होते वन नेशन वन इलेक्शन आणायचं आहे मात्र देशांमधील चार राज्यातील निवडणुका देखील घ्यायला ते घाबरत आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे कायदा पोलिसांचा धाक राहिला नाही. असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीत आम्ही हे जाहीरपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदापेक्षा महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचे संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं हे माविआचं कर्तव्य आहे यासाठी आम्ही सगळे काम करतोय असं पटोले म्हणाले.