MCA Election: उद्धव ठाकरे, शरद पवारांसह आठवलेंची मतदानाला दांडी, एमसीएच्या अध्यक्षपदासाठी 'दोन नाईकांमध्ये' लढत, कोण बाजी मारणार?
MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. अध्यक्षपदासाठी एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यात सामना होत आहे.
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association Election)अध्यक्ष अमोल काळेयांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज एमसीएच्या (MCA Election) अध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. एमसीएच्या एकूण 375 मतदारांपैकी 335 प्रतिनिधींनी मतदान केलं आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाकरता प्रतिष्ठेची झालेली निवडणूक प्रक्रिया एमसीएच्या मुख्यालयात सुरु आहे. सध्याच्या समितीचे उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक पदावर असलेले दोन नाईक अध्यक्षपदासाठी एकमेकांच्यासमोर उभे ठाकलेत. यामुळं निवडणुकीत रंगत आली आहे.मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी आले नाहीत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मतदानाकडे पाठ फिरवली.
अजिंक्य नाईक अन् संजय नाईक आमने सामने
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे.त्यामुळे त्याचं अध्यक्षपद मिळवणं ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट मानली जाते.
एमसीएच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. विशेष बाब म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी आले नाहीत. रामदास आठवले देखील मतदानाला अनुपस्थित राहिले.तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड धावतपळत मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळालं.
अजिंक्य नाईक यांच्यापाठीमागे विरारच्या राजकारणाचे थेट नातेसंबंध तसेच त्यांचा क्रिकेट क्लबसोबत असलेला चांगला संपर्क यामुळे शरद पवारांचा आशिर्वाद तर अमोल काळेचा शेवटपर्यंत जवळचा मित्र म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य नाईक यांच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे बीसीसीआयचे खजिनदार आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध आणि मुंबई क्रिकेटचे उपाध्यक्ष या नात्यानं संजय नाईक हे देखील अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.
तसं पाहायला गेलं तर या निवडणूकीनंतर अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा जेमतेम 15 महिन्यांचा आहे.दोघेही एकाच गटाचे असले तरी दोघंही दोन टर्म एमसीएच्या राजकारणात सक्रिय असल्यानं त्यांना 2025 च्या पुढील निवडणुकीत सहाभागी होता येणार नाही. कुलिंग पिरियडनंतर या दोघांना अध्यक्षपदासाठा 2028 ची वाट पाहावी लागेल. मात्र या दरम्यानचा काळ सारा गणित बदलण्यास पुरेसा आहे. त्यामुळे अध्यक्षपद मिळवायचंय तर अजिंक्य नाईक आणि संजय नाईक या दोघांकडे हीच उत्तम संधी आहे.
एमसीएचे मतदार कोण आहेत?
मैदान क्लब : 211
ऑफिस क्लब : 77
शाळा, महाविद्यालय: 37
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू: 50
एकूण मतदार: 375
इतर बातम्या :
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कशी होते? कोणाला मतदान करता येते? जाणून घ्या A टू Z माहिती