MNS Meeting : ...तर पदावरुन दूर व्हा, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
Raj Thackeray : मुंबईतील (Mumbai) वांद्रे एमआयजी क्लब इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. या बैठकीत राज ठाकरे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. "योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरुन दूर व्हा," अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिली.
गट अध्यक्षांची नेमणूक न झाल्याने राज ठाकरे नाराज
जे पदाधिकारी विभाग पातळीवर योग्य पद्धतीने काम करत नाहीत त्यांची यादी बनवण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. गट अध्यक्षांच्या नेमणुकी न झाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत जाऊन त्यांची काम करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पदाधिकाऱ्यांची बैठक कशासाठी?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आज (13 नोव्हेंबर) मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील लोकसभानिहाय परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या बैठकीत संवाद साधणार आहेत. त्याचसोबत 27 नोव्हेंबरला मुंबईत मनसे गट नेत्यांचा जो मेळावा होणार आहे त्याच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे. मनसेने याआधीच निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.
राज ठाकरेंकडून निवडणुकीचं भाकित
राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात लवकरच कोणत्या निवडणुका होणार आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. "मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय," असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील परळमधल्या कामगार मैदानात मनसेतर्फे कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
निवडणुकीच्या दृष्टीने आमची बैठक : संदीप देशपांडे
"आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आमची बैठक आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही युतीबाबत कधीही बोललो नव्हतो. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत. मनसे प्रवक्त्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक आहे," अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.
संबंधित बातमी