Raj Thackeray: ऐतिहासिक फर्मानातील भाषा पाहून राज ठाकरे म्हणाले, हे अजित पवार बोलतात तसं लिहलंय...
ऐतिहासिक कागदपत्रं पाहताना राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, हे अजित पवार बोलतात तसं लिहलंय...
पुणे: मनसेप्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या खास ठाकरी वकृत्त्व शैलीसाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे भाषणांमध्ये किंवा एखाद्याशी बोलताना मिश्कील किंवा तिरसक टिप्पणी करण्याच्याबाबतीतही राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा हातखंडा आहे. त्यांच्या याच शैलीचा प्रत्यय शनिवारी पुण्यात आला. राज ठाकरे यांनी काल पुण्यातील इतिहास संशोधक मंडळाच्या नव्या इमारतीची पाहणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातर्फे मंडळाला २५ लाख रूपयांच्या देणगीचा धनादेशही सुपूर्द केला. परंतु, यावेळी घडलेला एक किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सदाशिव पेठेतील इतिहास संशोधक मंडळात आल्यानंतर एक अभ्यासक राज ठाकरे यांना त्याठिकाणी ठेवण्यात आलेले विविध ऐतिहासिक दस्ताऐवज दाखवत होते. यादरम्यान राज ठाकरे यांना महाराष्ट्रात असणाऱ्या आदिलशाही, निजामशाही अशा विविध राजवटींच्या काळातील शासकीय फर्मांनाविषयी माहिती दिली जात होती. त्यापैकी एका फर्मानातील भाषा पाहून राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. या फर्मानात कोणत्याही विरामचिन्हांचा वापर करण्यात आलेला नव्हता. ते पाहून राज ठाकरे यांनी म्हटले की, 'अजित पवार (Ajit Pawar) बोलतात तसं लिहलंय हे, स्वल्पविराम नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही'. राज ठाकरे यांचे हे वाक्य ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलाय: राज ठाकरे
महाराष्ट्राकडे हजारो वर्षांचा इतिहास आहे. बाकीच्यांकडे भूगोल आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातील ऐतिहासिक ठेवा अनमोल आहे. प्रत्येकाने हा ठेवा आपल्या नजरेखालून घातला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. मंडळाला भेट देण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. पण मी यानंतरही पुन्हा येथे येईन,असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी बाबरीची वीट इतिसाह संशोधक मंडळाला दिली
काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना १९९२ साली पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीची वीट भेट म्हणून दिली होती. या विटेवरही संशोधन व्हावे, त्या वेळच्या बांधकामाचा अभ्यास व्हावा, यासाठी राज ठाकरे यांनी ही वीट भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली.
आणखी वाचा
राज ठाकरे म्हणतात, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम!