Thane : शिंदेंच्या नरेश मस्केंची डोकेदुखी थांबेना, भाजपचा विरोध सुरूच, नवी मुंबईनंतर मिरा भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
Naresh Mhaske : ठाण्याची जागा ही भाजपला मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असताना त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेतून नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्यातून शिवसेना शिंदे गटाच्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची उमेदवारी जाहीर होताच मिरा भाईंदरमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचे (Mira Bhayandar BJP) राजीनामा सत्र सुरू झाले आहे. भाजपाचे मिरा भाईंदर शहर जिल्ह्याचे महासचिव ध्रुवकिशोर पाटील, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातिब आणि भाजपाचे मिरा भाईंदरचे भाजप युवा मोर्चाचे महासचिव विशाल पाटील, मिरा भाईंदरचे भाजपा प्रवक्ते निरज उपाध्ये यांनी राजीनामा दिला आहे.
ठाणे लोकसभेत सर्वाधिक आमदार आणि प्रमुख तीनपैकी दोन पालिकांवर भाजपाची सत्ता असल्याचा दाखला देत ही जागा भाजपाने लढवण्याचा आग्रह मिरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. बुधवारी महायुतीकडून शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचं चित्र आहे.
ठाण्यासाठी भाजप आग्रही होता
ठाण्याच्या जागेवर सुरूवातीपासूनच भाजपचा आग्रह होता. भाजपच्या विचारसरणीचा पाया घालणाऱ्या रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलं होतं. पण 1996 च्या निवडणुकीत आनंद दिघेंनी ही जागा शिवसेनेसाठी मागून घेतली आणि तेव्हापासून ही जागा शिवसेनेकडे आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या जागेवर भाजपने दावा केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याचा दाखला देत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपने केला होता. आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे.
नवी मुंबईतही नाराजीनामा
शिंदे गटाच्या नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणाहून इच्छुक असलेल्या भाजपच्या संजीव नाईक यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचं दिसतंय. त्यामुळे नवी मुंबईतल्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनंतर शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली. महायुतीचे कार्यकर्ते शब्द पाळतील आणि मस्के यांना मोठं मताधिक्य देतील अशा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांचा गड मानला जाणारी ठाण्याची जागा भाजप स्वतःकडे घेण्यास उत्सुक होते. त्यासाठी भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे चर्चेत होती. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांचे नाव चर्चेत होते. यामध्ये संजीव नाईक आणि सेनेकडून प्रताप सरनाईक यांची नावे आघाडीवर होती.
मात्र एकनाथ शिंदे यांच्या हार्ड बार्गेनिंगमुळे ठाण्याची जागा सेनेला मिळाली तर अनपेक्षितपणे नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे इतर चार नावांचा पत्ता कट झाला आहे. आता सेनेतील दोन इच्छुक आणि भाजपमधील दोन इच्छुक असलेले नेते नरेश मस्के यांना कशाप्रकारे मदत करतात हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: