BJP on Naresh Mhaske : नरेश म्हस्केंना उमेदवारी देऊन आमच्या पाठित खंजीर खुपसला, भाजप पदाधिकारी आक्रमक
BJP ON Naresh Mhaske, Thane : ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राजन विचारे (Rajan Vichare) यांना उमेदवारी दिली.
BJP ON Naresh Mhaske, Thane : ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राजन विचारे (Rajan Vichare) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, बुधवारी (दि. 2) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, नरेश म्हस्के यांना उमेदवारी देताच भाजपा पदाधिकारी नाराज झाले आहेत. नरेश म्हस्केंना उमेदवारी देऊन आमच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची भावना भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा पदाधिकारी काय म्हणाले?
नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा पदाधिकारी म्हणाले, ठाण्यात नरेश म्हस्के यांना उमेदवारी देवून शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांचे साटेलोटे आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या समोर डमी उमेदवार उध्दव ठाकरे यांनी दिला, तर ठाण्यात राजन विचारे यांच्या समोर एकनाथ शिंदे यांनीही डमी उमेदवार दिला. नरेश म्हस्के यांचे काम शून्य आहे. देशातील सर्वात सुंदर आणि विकसित शहरावर ताबा घेण्यासाठी ठाण्यातील उमेदवार दिला. नरेश म्हस्के यांचे काम नवी मुंबईतील भाजपा पदाधिकारी करणार नाहीत.
संजीव नाईक यांना उमेदवारी द्या
अजून ही वेळ गेलेली नाही. नरेश म्हस्के यांची उमेदवारी रद्द करून संजीव नाईक यांना द्या. ठाणे लोकसभेत सहा आमदार पैकी चार आमदार भाजपाचे आहेत, असंही भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय, संजीव नाईक यांना उमेदवारी मिळावी, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असंही भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
राजन विचारेंना पुन्हा एकदा उमेदवारी
ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं आहे. राजन विचारे हे ठाण्याचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा दारुण पराभव केला होता. राजन विचारे यांना 7 लाख 40 हजार मतं मिळाली होती. तर आनंद परांजपे यांनी 3 लाख 28 हजार मतं मिळवली होती. त्यामुळे जवळपास 4 लाखाच्या मताधिक्याने राजन विचारे यांनी विजय मिळवला होता. मात्र, या निवडणुकीत राजन विचारे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे महायुती ठाण्यात त्यांची संपूर्ण ताकद लावण्यास सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंनी निष्ठावंत शिवसैनिकाला पुन्हा एकदा मैदानात उतरवून खेळी केली आहे. एकनाथ शिंदे विरोधात गेल्याने ठाकरेंच्या उमेदवाराला किती फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या