राज ठाकरे शाळकरी मुलांप्रमाणे तडजोड करतील असं वाटत नाही; बंधूंच्या युतीवर मंत्री सामंत म्हणतात...
राज ठाकरे यांची ती मुलाखत दीड महिन्यापूर्वीची असून शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्थींवर राज ठाकरे तडजोड करतील असे मला वाटत नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका मुलाखतीत ठाकरे कुटुंबातील आमचे वाद किरकोळ आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे. त्यामुळे, महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास माझी तयारी असल्याचे म्हटले. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रतिसाद देत मी किरकोळ वाद मिटवायला तयार आहे, पण माझी एक अट आहे असे म्हणत राज ठाकरेंना टाळी दिली. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज-उद्धव एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. राजकीय नेत्यांकडूनही या चर्चांवर प्रतिक्रिया येत आहेत. राजकारणात कोणीही एकत्र आलं तर चांगलंच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राज ठाकरे हे कुठल्याही अटी-शर्ती मानणारे नाहीत, असे म्हणत हे एकत्रिकरण शक्य नसल्याचे सूचवले आहे.
राज ठाकरे यांची ती मुलाखत दीड महिन्यापूर्वीची असून शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्थींवर राज ठाकरे तडजोड करतील असे मला वाटत नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी यांनी दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा एक विचार आहे. ते आपल्या मतावर ठाम असतात. मी त्यांना जितकं ओळखतो, त्यांना झुकवून युती होऊ शकेल असे वाटत नसल्याचेही सामंत यांनी म्हटले. शिवसेना पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी राज-उद्धव युतीवर आपली भूमिका मांडली.
यांच्या अटी काय तर देवेंद्र फडणवीस यांना बोलायचे नाही. एकनाथ शिंदे यांना पाहायचे नाही. अशा कुठल्या अटी शर्थी पुढे झुकून राज ठाकरे युती करतील असे वाटत नाही. आम्ही राज ठाकरेंना भेटलो ते साहित्य संमेलनात त्यांच्या उपस्थितीचे आभार मानण्यासाठी, यात कोणताही राजकीय विषय नव्हता, अशी माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली.
युतीचा विषय संवेदनशील, मनसैनिकांनी बोलू नये
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत 29 तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
निवडणुका होईना, मनसेनं मुंबईत भरवलं प्रतिपालिका सभागृह; आदित्य ठाकरेंनाही निंमत्रण, महौपौर कोण?

















