निवडणुका होईना, मनसेनं मुंबईत भरवलं प्रतिपालिका सभागृह; आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण, महापौर कोण?
मनसे कडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येत असून प्रति महापौरही असणार आहे. तसेच, सभागृहात जनतेच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

मुंबई : राज्याच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) राज ठाकरेंच्या नेतृत्वात शाडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती. मात्र, मनसेचा शाडो कॅबिनेट पॅटर्न फेल झाल्यानंतर आता मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणार आहे इथे 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येतोय. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेच्यावतीने हे प्रतिसभागृह भरवण्यात आलं आहे. त्यासाठी, मसनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडून मुंबईतील (Mumbai) सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवून सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.
मनसेकडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येत असून प्रति महापौरही असणार आहे. तसेच, सभागृहात जनतेच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. याप्रती पालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण मनसेच्या वतीने देण्यात आलं आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, समाजवादी पार्टीचे नेते सईसभाई शेख, काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवााड, राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आदित्य ठाकरे शिवसेना युबीटी पक्षासह इतरही पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे पहिले 'प्रतिसभागृह "भरणार आहे. त्यामध्ये, मुंबईतील रस्ते, आरोग्य, आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रती पालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
मनसेनं निमंत्रण पत्रात काय म्हटले?
मुंबई महानगरपालिका ही दोन चाकांवर चालते. एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी, पण गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकयतिनिधी हे चाक बंद झाले आहे. मुंबईत अनेक समस्या आहेत, ज्यावर चर्चा व्हावी, मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ह्या पर्चा होत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा पडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत. ज्यामध्ये विविध राजकीय संकटना, राजकीय प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी. महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे चर्चचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश आहे, असे मनसेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा
ती आत्महत्या नसून हत्या; किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप, हाती बॅनर घेऊन वृद्धाचं मंत्रालयासमोर आंदोलन
























