(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून 1 हजार मराठा उमेदवार रिंगणात उतरणार
Maratha Reservation Issue : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून तब्बल एक हजार मराठा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.
Maratha Reservation Issue In Loksabha Election 2024 : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राज्यातच नव्हे तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता देशाच्या राजकारणात गाजण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघातून (Varanasi Lok Sabha Constituency) तब्बल एक हजार मराठा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. विशेष म्हणजे याबाबतचे निवेदन देखील धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या निर्णय अनेक जिल्ह्यात घेण्यात आला आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाने थेट मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून मराठा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट स्वीकारून स्वतंत्र मराठा कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक विनायक पाटील यांच्यासह एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे...
हैदराबाद स्टेट जनगणनेत मराठवाड्यातील मराठा जातीची नोंद कुणबी मराठा होती. 1909 मध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा जातीची कुणबी अशी नोंद आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने मराठवाड्यातील मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश केला आहे. तसेच आयोगाच्या शिफारशीनुसार 1 मे 1960 रोजी मराठवाडा संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत विनाअट सामील झाला. त्यामुळे राज्यघटनेच्या 371 कलमानुसार मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
निवडणूक 'ईव्हीएम'वर कशी होणार?
मागील अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, वाराणसी लोकसभा मतदारसंघातून एकाचवेळी 1 हजार मराठा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने 'ईव्हीएम'वर निवडणूक घेणं शक्य होणार नाही. प्रत्यक्षात एवढे उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
होईल तेवढ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभं करण्यासाठी तयारी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून धाराशीवबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यात लोकसभा निवडणुकीत होईल तेवढ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभं करण्यासाठी तयारी केली जात आहे. काही जिल्ह्यात प्रत्येक गावातून एक उमेदवार अशी तयारी सुरु आहे. यासाठी लागणारा पैसे, कागदपत्रे याबाबत देखील नियोजन केले जात आहे. काही ठिकाणी वर्गणी देखील गोळी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :