विधानसभेची खडाजंगी: शिवसेनेतील बंडानंतरची पहिली विधानसभा; ठाकरे की, शिंदे, मुंबई शहरातील मराठी मतांचा कौल कोणाला?
Mumbai Vidhan Sabha Elections : कष्टकऱ्यांपासून अगदी कोट्यधीशांपर्यंत सर्वांना समावून घेणाऱ्या मुंबईला भारताच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्ष मुंबई जिंकण्यासाठी स्वतःला अक्षरशः झोकून देतो.
Mumbai Vidhan Sabha Election 2024: मुंबई (Mumbai News) म्हणजे, स्वप्ननगरी... देशभरातून अनेकजण इथे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. सतत धावणारं हे शहर येथील उद्योगधंदे (Industries) आणि आर्थिक उलाढालींसाठी (Financial Turnover) ओळखलं जातं. पण, या शहराती राजकीय गणितंही तेवढीच भारी आहेत. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं या शहराची राजकीय परिस्थिती (Political Situation In Mumbai) काहीशी वेगळी आहे. 1990 मध्ये मुंबई शहर आणि उपनगर असे दोन जिल्हे तयार करण्यात आले. पण, या दोन्ही जिल्ह्यांची नागरी सुविधांची जबाबदारी बृहन्मुंबई महापालिकेकडे आहे. मुंबई शहर हा विभाग म्हणजे, मूळ मुंबई. या भागात मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबई शहर म्हणजे, पूर्वीचं गिरणगाव, या गिरणगावावर कधीकाळी मुंबईची आर्थिक उलाढाल अवलंबून होती.
तसं पाहायला गेलं, तर संपूर्ण मुंबई शहरच कष्टकऱ्यांचं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कष्टकऱ्यांपासून अगदी कोट्यधीशांपर्यंत सर्वांना समावून घेणाऱ्या मुंबईला भारताच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्ष मुंबई जिंकण्यासाठी स्वतःला अक्षरशः झोकून देतो. पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि शिवसेना हे समीकरणं बनलं आहे. मग निवडणूक कोणतीही असो, आव्वाज फक्त शिवसेनेचाच, असंच काहीसं चित्र पाहायला मिळतो. राजकीय वर्तुळात तर मुंबई म्हणजे, शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मुंबई, अशा चर्चाही सुरू असतात.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधासभेची अद्याप घोषणा झालेली नाही. पण, विधानसभेसाठी सर्व पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेत फूट, ठाकरे विरुद्ध शिंदे लढाई
मुंबई शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला. पण साधारणतः दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीनंतर पक्ष दोन भागांत विभागला गेला. एक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पक्ष आणि दुसरा शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा पक्ष. पुढे शिवसेना आणि धनुष्यबाणावरुन दोन्ही गटांत अस्तित्वाची लढाई झाली आणि अखेर न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेंच्या पारड्यात पडला, तर ठाकरेंना नवं चिन्ह आणि नवं नाव घ्यावं लागलं. पुढे शिंदेंनी भाजपच्या साथीनं राज्यात सरकार स्थापन केलं आणि ठाकरेंनी महाविकास आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतला आणि नव्यानं पक्षबांधणीला सुरुवात केली. आता शिवसेनेतील बंडानंतर पहिली विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे आमने-सामने येणार असून त्यांचा निर्णय जनमतानं होणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक खऱ्या अर्थानं चुरशीची होणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. पण, यंदाच्या विधानसभेत खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक होऊ शकतात. त्या अनुषंगानं राजकीय वर्तुळातही लगबग पाहायला मिळत आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
महाराष्ट्राच्या विधानसभेवर (Maharashtra Assembly) झेंडा फडकवण्यासाठी मुंबई जिंकणं राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 2019 च्या निवडणुकीत मुंबईवर (Mumbai Assembly Seats) भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळालेलं. 36 पैकी तीसपेक्षा जास्त जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार विजयी झालेले. तर काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलेलं. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षानं आपली एक जागा राखण्यात यश मिळवलेलं.
ज्या जागा शिवसेना-भाजप युतीच्या हातून निसटल्या, तिथेही बंडखोरीचा फटका बसल्यामुळे काँग्रेसला फायदा झाल्याचं 2019 च्या निवडणुकीत पाहायला मिळालेलं. 2019 ची निवडणूक ठाकरे घराण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. कारण, पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून कुणीतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं. ठाकरे घराण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहिले सदस्य आदित्य ठाकरे वरळीतून विजयी झालेले. मात्र, मातोश्रीच्या अंगणातील म्हणजेच, वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेनं गमावलेली. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही पराभूत झालेले. राष्ट्रवादीला नवाब मलिक यांच्या एकमेव जागेवर विजय मिळवता आला. काँग्रेसनं तीन जागा जिंकलेल्या, तर समाजवादी पक्ष एका जागी निवडून आलेली.
2019 मध्ये मुंबईत कोणी किती जागा जिंकलेल्या?
2019 च्या मुंबई विधानसभेत शिवसेनेनं महायुतीच्या 36 पैकी 19 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेसनं 28 जागांवर निवडणूक लढवली होती, पण पक्षाला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीनं एका जागेवर तर समाजवादी पक्षानं एक जागा जिंकली. उर्वरित 11 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यंदा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत 36 जागांसाठी घमासान होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेच्या जागांवर महानगरपालिका निवडणुकीची गणितं अवलंबून असतात. अशातच मुंबई विधानसभेत जो बाजी मारणार, महानगरपालिकेत त्याचा विजयाचा मार्ग मोकळा होणार, हे मात्र नक्की.
मुंबईतील सध्याच्या आमदारांची यादी
- धारावी विधानसभा : वर्षा गायकवाड (काँग्रेस) : सध्या लोकसभेवर निवड दिल्यामुळे राजीनामा
- सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
- वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)
- माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
- वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)
- शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)
- भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)
- मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)
- मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)
- कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)
विधानसभानिहाय 2019 मधील लढती आणि मताधिक्य
1. धारावी विधानसभा : वर्षा गायकवाड (काँग्रेस) : सध्या लोकसभेत खासदार
विद्यमान आमदार वर्षा गायकवाड धारावी मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. धारावी विधानसभा मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. परंतु सर्वांच्या नजरा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड व शिवसेनेचे आशिष मोरे यांच्यातील लढतीकडे होत्या. अखेर या अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड 11 हजार 824 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 53 हजार 915 मतं मिळाली. या विजयासह त्यांनी आमदारकीची हॅट्रिक साजरी केली आहे. दरम्यान आशिष मोरे यांना 42 हजार 93 मतं मिळाली. तर एमआयएमचे मनोज संसारे तिसऱ्या क्रमांवर राहीले त्यांना 13 हजार 97 मतं मिळाली.
2. सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी पंधरा उमेदवार रिंगणात असून, भाजपचे कॅप्टन आर तामिळ सेल्वन यांनी काँग्रेसच्या गणेश कुमार यादव यांचा 14225 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे. 40452 मतांनी काँग्रेसचे गणेशकुमार यादव यांचा पराभव झाला. सायन-कोळीवाडा विधानसभा हा मतदारसंघा मागील काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला समजला जात आहे. इथले भाजपचे आमदार आर. तमिळ सेल्वन यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे.
3. वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)
महाराष्ट्रातील वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कालिदास नीळकंठ कोळंबकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे शिवकुमार उदय लाड यांचा 30845 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे शिवकुमार उदय लाड दुसऱ्या क्रमांकावर राहिले, मात्र पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील मतांचा फरक खूप मोठा आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजपचे उमेदवार कालिदास नीळकंठ कोळंबकर यांना 56314 तर काँग्रेसचे उमेदवार शिवकुमार उदय लाड यांना 25608 मतं मिळाली आहेत. अशा प्रकारे दोघांमध्ये 30845 मतांचा फरक पडला. तर मनसेचे उमेदवार आनंद मोहन प्रभू 15745 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
4. माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
मराठी माणसांचं प्राबल्य असलेला माहिम मतदार संघ मुंबईतील महत्त्वाच्या मतदार संघांपैकी एक आहे. शिवसेना भवन या मतदारसंघात असल्यानं तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं निवासस्थानही याच मतदार संघात आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली होती. माहिम हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ समजला जातो. 2019 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर, मनसेचे संदीप देशपांडे यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. 2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेनं जिंकला होता. माहीम हा महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांचा 18 हजार 647 मतांनी पराभव करून जागा जिंकलेली.
5. वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)
2019 च्या निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे, वरळी विधानसभा मतदारसंघ. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं या मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं.वरळीकरांनी आदित्य ठाकरेंच्या बादूनं कौल दिल्याचं स्पष्ट झालं. पहिल्या फेरीपासूनच आदित्य ठाकरेंनी आघाडी मिळवली होती. तब्बल 89 हजार 248 मतं मिळवून आदित्य ठाकरेंनी विजयावर शिक्कामोर्तब केला.
6. शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)
शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवलेला. अजय चौधरी यांनी तब्बल 42 हजार मतांनी विजय मिळवत पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघावर भगवा फडकवलेला. चौधरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार उदय फणसेकर आणि मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दणदणीत पराभव केला. चौधरींच्या तुलनते या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात तितका जनसंपर्क नव्हता. अजय चौधरी यांचा विधानसभा निवडणूक 2014 मध्येही विजय मिळवलेला.
7. भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)
2019 मध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांचा दणदणीत पराभव केलेला. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी मोठा विजय मिळवला होता. यामिनी यांना एकूण 51180 मतं मिळाली, तर वारिस पठाण यांना 31157 मतं मिळाली होती.
8. मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)
मुंबईतील सर्वात श्रीमंत मतदारसंघ अशी ओळख असलेला मतदारसंघ म्हणजे, मलबार हिल विधानसभा मतदारसंघ. मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी मोठा विजय मिळवलेला. मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा 71872 मतांनी पराभव केलेला. तर, भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांना 93538 मतं मिळालेली, तर काँग्रेसला 21666 मतं मिळालेली.
9. मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)
मुंबादेवी विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये काँग्रेसनं बाजी मारली होती. मुंबादेवी हा महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमीन पटेल यांनी शिवसेनेच्या पांडुरंग सकपाळ यांचा 23655 मतांच्या फरकानं पराभव करून जागा जिंकली होती.
10. कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)
कुलाबा हा महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ आहे. 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपनं ही जागा जिंकली होती. कुलाबा हा महाराष्ट्रातील मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये भाजपचे राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे अशोक अर्जुनराव जगताप यांचा 16159 मतांच्या फरकानं पराभव करून जागा जिंकली होती.
पक्षातील फुटीमुळे जागावाटपात बदललेली गणितं
यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना यांची महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीमध्ये थेट लढत होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. या लढतीत शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात मोठा तिढा निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदा मुंबई शहराच्या 11 विधानसभा जागा कोणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :