(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेची होणार अडचण! रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा
Maharashtra Politics : भाजपकडून उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित नाही मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडून घेऊन भाजप आपल्या ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे.
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (lok Sabha Election) जागावाटपावरुन सत्ताधारी महायुतीमध्येही नाराजीनाट्य असल्याचं ऐकायला मिळतेय. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमागे लोकसभा जागावाटप हेच कारण असल्याचं सांगण्यात येतेय. पण जागावाटप ठरण्याआधीच आता भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्यापैकीच एक मतदारसंघ हा रामटेक आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारा खासदार कमळ चिन्हावर लढणारा असेल, असं स्थानिक भाजप नेत्यांनी म्हटलेय. त्यानंतर महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरही संघर्ष असल्याचं दिसतेय.
रामटेक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. रामटेक मतदारसंघ परंपरेने शिवसेनेचा मतदारसंघ असून महायुतीमध्ये गेल्या अनेक लोकसभा निवडणुका या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार राहिलेला आहे. सध्याही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले कृपाल तुमाने रामटेकमधून शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, आता भाजपने या मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे. या मतदारसंघात सर्वत्र आमचे संघटन मजबूत असून रामटेक मतदारसंघात भाजपचा खासदार असावा अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे. आम्ही ती पक्षश्रेष्ठींना कळविली असून यंदा रामटेक मधून भाजपचाच खासदार निवडून येईल असा दावा भाजप नेते करत आहेत. यंदा रामटेक मधून निवडून येणारा खासदार कमळ चिन्हावर निवडून येणारा असेल असा दावाही स्थानिक भाजप नेत्यांचा आहे. मात्र तो भाजपचाच असेल की दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेला असेल, यावर मात्र भाजप नेते स्पष्ट बोलत नाही आहेत. त्यामुळे रामटेक मतदारसंघाच्या मुद्द्यावरून एका बाजूला भाजप आणि शिवसेनामध्ये जोरदार रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे.तर दुसऱ्या बाजूला रामटेक मधून भाजपचा खासदार निवडून आणण्याचा हट्ट धरणारा भाजप ऐन वेळेला इतर पक्षातील उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपकडून उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित नाही मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडून घेऊन भाजप आपल्या ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे.
भाजपचं कोणत्या मतदार संघावर लक्ष?
रामटेक, धारिशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपनं विशेष लक्ष दिलेय. 2019 च्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक लढवली होती. नाशिकमध्ये कमळचं हवं, असं येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय आणखी चार पाच मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचाच उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. भाजपमधील या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनीही आपल्याकडे भाजपचं अतिक्रमण नको, आपणच लढलं पाहिजे, असा अग्रह मुख्यमंत्र्यांकडे केलाय. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर दबाव वाढल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा :
महायुतीमध्ये तिढा, शिवसेनच्या जागांवर भाजप नेत्यांकडून दावा, शिंदेंची धाकधूक वाढली