(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : 2024 मध्ये सत्तेवर यायचंय, शिवसेनेसोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेड कामाला, मराठा सेवा संघात मोठे बदल
Maharashtra Politics : शिवसेनेसोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघात मोठे फेरबदल करण्यात येणार आहे.
Mumbai News : शिवसेनेसोबतच्या (Shiv Sena) युतीनंतर संभाजी ब्रिगेडची (Sambhaji Brigade) मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघात (Maratha Seva Sangh) मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. आज मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीनंतर मराठा सेवा संघात बदलाचे वारे वाहत आहेत. यानुसार मराठा सेवा संघात तरुणांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात येणार आहे.
मराठा सेवा संघात तरुणांकडे नेतृत्व?
नव्या फेरबदलानुसार, मराठा सेवा संघाची जबाबदारी 35 वर्षांच्या आतील मराठा समाजाच्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे देण्याचा विचार सुरु आहे. या पुनर्रचनेसाठी मराठा सेवा संघाचे राज्यभर बैठका सत्र सुरु करण्यात येत आहे.
केवळ 30 टक्केच जुने जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत राहतील. 2024 मध्ये संभाजी ब्रिगेड-शिवसेना सत्तेवर यावी यासाठी मराठी सेवा संघ काम करणार आहे. त्यासाठीच नवे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती
दरम्यान, नुकतीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर 26 ऑगस्ट रोजी एकत्र पत्रकार परिषद घेत, उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली.
आगामी निवडणुका एकत्र लढवणार
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार आहे. इतकंच नाही तर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांचं म्हणणं काय?
प्रबोधनकार ठाकरे यांचेच विचार संभाजी ब्रिगेडने नेहमी स्वीकारले आहेत, असा दावा करत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवसेने सोबतच्या युतीचं समर्थन केलं आहे. शिवसेनेसोबत युती करताना शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या सामाजिक भूमिका वेगळ्या असू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. राजकारणात सर्व काही शक्य आणि क्षम्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
VIDEO : पुरुषोत्तम खेडेकरांना शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती पटलीय का?
संबंधित बातम्या
मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा, ठाकरे म्हणाले...