Road Potholes: आता चार दिवसांत बुजवले जाणार रस्त्यावरचे खड्डे; मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले...
Road Potholes: सार्वजनिक बांधकाम विभागाने आता नवीन प्रणाली आणली आहे. आपण रस्त्यावरील खड्ड्यांचा फोटो पाठवला तर चार दिवसांत खड्डे बुजवले जाणार आहेत, अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
Road Potholes : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम विभागाचा कारभार अधिक वेगवान होऊ शकतो, असे मत सार्वजनिक बांधकांम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले. याच वेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीएमआयएस) या नव्या प्रणालीची माहिती दिली. या नव्या प्रणालीनुसार, बांधकाम विभागाचा पूर्ण तपशील आपल्याला मिळू शकतो. तसेच, या प्रणालीद्वारे रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार केल्यास 4 दिवसांत खड्डे देखील बुजवले जाणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीएमआयएस) ही नवीन प्रणाली आणली आहे, ज्यातून बांधकाम विभागाचा संपूर्ण कारभार लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते, महत्त्वाच्या इमारती, पूल बांधण्याचे काम नेहमीच सुरू असते. या विभागाकडून राज्यात 1 लाख 5 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे पसरले आहे. जवळपास 33 हजार इमारतींचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी बजेटमध्ये 25 हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी या वर्षी देण्यात आल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. बांधकाम व्यवस्था पारदर्शक राहावी, जनतेसाठी चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम प्रणाली (पीएमआयएस) मधून कोणती माहिती मिळणार?
राज्यातील सर्व रस्त्यांचे जाळे या प्रणालीद्वारे दिसणार आहे. विशिष्ट रस्ता कधी तयार झाला? त्या रस्त्यासाठी किती खर्च करावा लागला? पुढे किती खर्च करावा लागणार? रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? या सगळ्याची माहिती या सिस्टीमद्वारे लोकांना घेता येणार असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे. येणाऱ्या काळात बांधकाम विभागातील प्रत्येक गोष्ट लोकांसमोर येणार आहे. विभागाच्या प्रत्येक कामाची माहिती या प्रणालीद्वारे लोकांना मिळणार आहे.
चार दिवसांत बुजवले जाणार खड्डे
पाऊस आणि त्यामुळे पडणारे खड्डे ही परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, जर या नव्या डिजिटल सिस्टीमचा योग्य पद्धतीने वापर केला तर या परिस्थितीवर मात करता येईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. लोकांनी एखाद्या रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो काढला आणि या सिस्टीमद्वारे आम्हला पाठवला, तर विभाग योग्य वेळेत हा खड्डा बुजवेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. तक्रार आल्यानंतर 4 दिवसांत खड्डे भरले गेले पाहिजे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.चार दिवसांत खड्डे न बुजवल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
नागरिकांनी ऑनलाईन प्रणाली अथवा अॅपद्वारे खड्ड्यांचे फोटो पाठवल्यानंतर चार दिवसांत खड्डे बुजवले जातील, अशी खात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. चार दिवसांत खड्डे बुजवले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार, अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
नागरिकांना कशी वापरता येणार प्रणाली?
प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम प्रणाली (पीएमआयएस) नागरिकांसाठी सुरू झाली आहे, मात्र अजून काही माहिती येणं बाकी आहे. दोन ते तीन महिन्यात प्रणालीसंदर्भात संपूर्ण माहिती येईल, अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या ऑनलाईन प्रणालीसोबत अॅपसुद्धा असेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. ज्यात खड्ड्याचे फोटो आणि संबंधित माहिती टाकली तर खड्डे बुजवले जातील. चार दिवसांत खड्डे बुजवले जातील, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: