(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election : एक जागा पण दोघांचा 'दावा'; संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिंदे गटात 'राजकारण'
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला असताना, भाजपकडून देखील तयारी सुरु आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने सर्वच महत्वाचे राजकीय पक्ष कामाला लागले असताना, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभा जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून या मतदारसंघासाठी तयारी सुरु असताना हा मतदारसंघ शिवसेनेचाच असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा करून येथे आमचाच उमेदवार दिला जाणार असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरून भाजप आणि शिंदे गटात 'राजकारण' पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले संदिपान भुमरे?
युतीत नेहमी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असताना भाजपकडून देखील जोरदार तयारी सुरु असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भुमरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरची लोकसभा मतदारसंघाची जागा आमची आहे. त्यामुळे ती आम्हीच लढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देणार तो निवडून येणार आहे. भाजप तयारी करत असेल तर तयारी सर्वच करत असतात, पण भाजप आणि आम्ही मित्रपक्ष म्हणूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहे.त्यामुळे युतीत त्यांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यावर ते निवडणूक लढवतील. तसेच आमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या आम्ही लढवणार आहोत. पण छत्रपती संभाजीनगर लोकसभा आमचीच जागा असून, यावर आमचाच दावा असणार असल्याचे भुमरे म्हणाले आहेत.
Lok Sabha Election : एक जागा पण दोघांचा 'दावा'; संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिंदे गटात 'राजकारण'@abpmajhatv pic.twitter.com/W5MRQPKkzq
— Mosin Shaikh (@mosinKS) May 6, 2023
भाजपकडून जोरदार तयारी...
शिंदे गटाचे नेते भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरीही, भाजपकडून देखील याच मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा संभाजीनगरमध्ये झाली. तर भाजपचे नेते तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी देखील एका बैठकीत कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला होता. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कराड जिल्हा पिंजून काढताना पाहायला मिळत आहे. मात्र शिंदे गटाकडून संभाजीनगरच्या लोकसभा जागेवर दावा केला जात असल्याने, युतीत ही जागा कोणाकडे जाणार यावर चर्चा रंगू लागली आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :