Maharashtra Election 2025 : लोकशाहीच्या उत्सवात पैशांचा पाऊस? चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष, तर बुलढाण्यात थेट पैसे देतानाचा व्हिडिओ व्हायरल
Election 2025 : चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.तर दुसरीकडे बुलढाण्यातील नांदुरा येथे देखील मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Maharashtra Election 2025 : महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना दुसरीकडे मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यात काही घटनांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवत भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तर दुसरीकडे बुलढाण्यातील नांदुरा येथे देखील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Chandrapur : भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष, पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल
चंद्रपूरमध्ये भाजप (BJP) उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत 500 रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे. अमोल चिल्लावार हा नगरसेवक पदासाठी उभा आहे. चिल्लावार यांचे घराचे मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेडमधून हे पैसे वाटप होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या व्हिडीओमध्ये चिल्लावार यांच्या हातात पाचशे रूपयांची गड्डी दिसत आहे. रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचं आणि ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुखांकडे पाठवल्याचं राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितलं आहे.
Nandura : उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
तर अशीच एक घटना बुलढाण्यातील नांदुरा येथे घडली आहे. नांदुरा नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आज होणार आहे. मात्र आदल्या दिवशी रात्रीच प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा























