Maharashtra Cabinet Expansion : अखेर आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट, शिंदे गटातील 'हे' आमदार शपथ घेणार!
शिंदे-फडणवीस सरकारच्या आज होणाऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तारात शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता अखेर कट झाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचं नाव नाही.
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (9 ऑगस्ट) होणार आहे. एकूण 18 आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. अवघ्या काही मिनिटांत भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदार शपथ घेतील. दरम्यान शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा पत्ता अखेर कट झाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचं नाव नाही.
राजभवनात सकाळी अकरा वाजता 18 आमदार शपथ घेणार आहेत. या आमदारांची नावं तिथल्या खुर्च्यांवर लावली आहे. यानुसार संजय शिरसाट यांचं नाव खुर्चीवर नाही. म्हणजेच आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा शपथविधी होणार नाही.
शिंदे गटातील मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
भाजपतील मंत्री
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत खडाजंगी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रचंड खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या आमदारांनी बंडखोरीला मदत केली अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं आहे. यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा पत्ता जवळपास कट झाला. संजय शिरसाट हे आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बंडखोरी करताना अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना मदत केली आहे. त्यामुळे शिरसाट यांना देखील मंत्रिपदाची अपेक्षा होती. काल रात्री झालेल्या बैठकीत संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका वाटू लागली. "यावेळच्या विस्तारात तुमचं नाव नसेल. मात्र पुढच्या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात तुमचं नाव निश्चित असेल. सध्या तरी तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही," असे स्पष्ट संकेत संजय शिरसाट यांना देण्यात आले. त्यामुळे संजय शिरसाट अतिशय नाराज झाले होते.
महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.