BJP Candidate list : गडकरींना नागपूरमधून उमेदवारी मिळणार का? किती खासदारांचा पत्ता कट होणार? महाराष्ट्रातील 25 उमेदवारांच्या घोषणेची आज शक्यता
Maharashtra BJP Candidate List : राज्यातील भाजपच्या 25 जागांवर दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती असून त्या ठिकाणच्या उमेदवारांची नावं आज घोषित केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी (Maharashtra BJP Candidate List) आज येण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील 25 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari From Nagpur) , बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde From Beed), चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार,जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते.
भाजपने या आधी 195 जणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यानंतर आता दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून त्यामध्ये राज्यातील 25 जणांच्या उमेवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीत 2019 साली जिंकलेल्या 23 जागा आणि पराभूत झालेल्या चंद्रपूर आणि बारामती या दोन, अशा 25 जागांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या जागांवर आता उमेदवार घोषित केले जाणार आहेत.
यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार,जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, आणि भिवंडीतून कपिल पाटील यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं. तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजप राज्यात 32 ते 34 जागा लढवणार?
राज्यात भाजपकडून जवळपास 34 जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून त्यावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या सहा खासदारांना बदलण्याचे भाजपकडून संकेत
भाजपकडून शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावं आहेत.
ही बातमी वाचा: