Shambhuraj Desai : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवार यांनी पोलीस दलाच्या वाहनातून निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Shambhuraj Desai on Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पोलीस दलाच्या वाहनातून निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. आता यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली (Deolali Assembly Constituency) आणि दिंडोरी मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) एबी अर्ज पाठवले. यावरून शरद पवारांनी गंभीर आरोप केला. या सरकारचे वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॉर्म पाठवला. आम्ही अनेक जिल्ह्यांमधून ऐकत आहोत, काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे, असे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
यावर शंभूराज देसाई म्हणाले की, त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी याबाबत तक्रार करावी. कारण अशा यंत्रणेचा वापर कोणीच कधीही करत नाही. आम्ही इतकं फिरत आहोत, आम्ही मंत्री आहोत उलट पोलिसांनी आमचे संरक्षण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर त्यांनी पोलीस महासंचालक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
दरम्यान, शरद पवार यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, शरद पवार यांच्या काळात असं चालायचं, आता त्यांना तसा भास होत असेल. आमच्या काळात तर असं काही होत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मराठवाड्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पहिली जाहीर सभा हिंगोलीत होणार