Maharashtra assembly Election 2024: विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत, रामदास आठवलेंकडून 10 जागांची मागणी, मग शिंदे गट-अजितदादांना किती जागा मिळणार?
Maharashtra Politics: राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 155 जागांवर लढण्याची तयारी भाजपने केल्याचे समजते. तसे झाल्यास शिंदे गट आणि अजितदादा गटाला तडजोड करावी लागू शकते. त्यामुळे हा फॉर्म्युला मान्य होणार का?
मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिंदे गट 100 तर अजित पवार गट तब्बल 90 जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही 10 जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti Seat Sharing) बिनशर्त पाठिंबा देणारा राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभेच्या 20 जागांवर लढण्याची शक्यता आहे. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) आतापर्यंत ते विधानसभेच्या नेमक्या किती जागा लढणार, याची माहिती समोर आली नव्हती.
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीत 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी असल्याचे समजते. तर महायुतीमधील अन्य तीन मित्रपक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याचे समजते. त्यामुळे आता जागावाटपाच्या चर्चेवेळी रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला होता. तर मविआने 30 जागांवर बाजी मारली होती. एक जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकली होती. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 खासदार निवडून आणले होते. मात्र, यंदा भाजपचे फक्त 9 उमेदवार विजय झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय घडणार, या विचाराने महायुतीच्या गोटातील धाकधूक वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला?
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीनेही विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवू शकतो. ठाकरे गटाच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात आणि शरद पवार गट विधानसभेला 80 ते 85 जागांवर लढू शकतो,अशी चर्चा होती. मात्र, त्यानंतर मविआने विधानसभेसाठी 96-96-96 चा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेला लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
विधानसभेला कोण किती जागांवर लढणार? महाविकास आघाडीने 96-96-96 चा फॉर्म्युला ठरवला?
दिवाळीपूर्वी विधानसभेची निवडणूक, लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर ठरणार महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला