राम सातपुतेंनी भर सभेत दरडावलेल्या धर्मा मानेच्या गावात भाजपला किती मतं? शरद पवारांचा उमेदवार किती मतांनी आघाडीवर?
Madha Lok Sabha Election : धर्मा माने हा राम सातपुतेंचा कट्टर कार्यकर्ता असून त्याचे गाव माळशिरस तालुक्यातील कन्हेर हे आहे. राम सातपुतेंच्या व्हायरल व्हिडीओमुळे धर्मा माने चर्चेत आला होता.
सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारत 30 जागा मिळवल्या तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. लोकसभा निकाल तर लागला पण आमदार राम सातपुतेंनी भर सभेत दरडावलेल्या धर्मा मानेच्या गावातून भाजपला किती लीड मिळालं याची उत्सुकता मात्र अनेकांना लागली आहे. त्या ठिकाणी कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली? राम सातपुतेंच्या इच्छेप्रमाणे भाजपला जास्त मिळाली का? या प्रश्नाचं उत्तर आता 'एबीपी माझा'ने शोधून काढलं आहे.
काय म्हणाले होते राम सातपुते? (Ram Satpute Viral Video)
भाजपचे सध्याचे माळशिरसचे आमदार आणि सोलापूर लोकसभेतून पराभूत झालेले उमेदवार राम सातपुतेंनी भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजीत निंबाळकरांसाठी सभा घेतली होती. त्यावेळी भर सभेत धर्मा माने या त्यांच्या कार्यकर्त्याला दरडावलं होतं. ते म्हणाले होते की, आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचं आहे. देणार ना, ए धर्मा, उठ. धर्मा माने लक्षात राहुदे, या गावात जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत. त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी मला काही माहिती नाही.
धर्मा मानेच्या गावातून भाजपला लीड मिळालं का? (Dharma Mane Malshiras Madha)
एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राम सातपुते ज्या धर्मा मानेला दरडावताना दिसतात, त्या धर्मा मानेच्या गावाचं नाव हे कन्हेर असं आहे. कन्हेर गाव हे माळशिरस तालुक्यात येत असून ते माढा लोकसभा क्षेत्रात येतं. या ठिकाणी भाजपच्या रणजीत निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होती.
कन्हेर गावची लोकसंख्या ही जवळपास 4000 इतकी आहे. तर या गावातल्या 2500 लोकांनी लोकसभेसाठी मतदान केलं. त्यामध्ये 985 मतदारांनी भाजपला मतदान केलं. तर जवळपास 1350 मतदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान केलं. तर उर्वरित मतदान इतर उमेदवाराना मिळालं. त्यामुळे कन्हेर गावात धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास 355 मतांची आघाडी मिळाली.
मनोज जरांगे फॅक्टरमुळे मोहितेंना लीड
धर्मा माने यांच्या कन्हेर गावात धैर्यशील मोहिते पाटलांना जे लीड मिळालं ते मराठा आरक्षणामुळे मिळाल्याची चर्चा आहे. मोहिते पाटलांने जे मतदान मिळालं आहे त्यापैकी जवळपास 600 मतं ही मराठा समाजाची असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कन्हेर या गावातही मनोज जरांगे इफेक्ट दिसून आला.
कोण आहे धर्मा माने? (Who Is Dharma Mane)
भाजप आमदार राम सातपुते यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आलेले धर्मा माने हा सातपुते यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. या व्हिडीओनंतर राम सातपुतेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की धर्मा माने माझा कार्यकर्ता असून त्याच्यावर माझं प्रेम आहे. त्यामुळे मी दरडावून नाही तर हक्काने त्याच्याकडून लीड मागितलं.
माढ्याच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या रणजीत निंबाळकरांचा 1.19 लाख मतांनी पराभव केला. आमदार राम सातपुतेंनी भर सभेत दरडावून भाजपला लीड मागितलं, पण गावकऱ्यांनी मात्र राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटलांना लीड दिलं. त्याची चर्चा आता माळशिरसमध्ये चांगलीच रंगली आहे.
ही बातमी वाचा: