Uttam Jankar : विशेष विमानानं नागपूरला जाऊन फडणवीसांची भेट, उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला, माढ्यात नवा ट्विस्ट
Uttam Jankar : माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आज सकाळीच शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. उत्तम जानकर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे.
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाच्या (Madha Lok Sabha Seat) निवडणुकीत माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचं महत्त्व वाढलं आहे.विशेष विमानानं नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणाऱ्या उत्तम जानकर आज शरद पवारांची (Sharad Pawar ) भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उत्तम जानकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची बाजू ऐकून घेतली आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची बाजू जाणून घेणार आहोत, असं म्हटलं. उत्तम जानकर 19 एप्रिलला त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील देखील जानकर यांच्यासह भेटीसाठी दाखल झाले आहेत.
शरद पवारांसोबत पुण्यात भेट
उत्तम जानकर शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाले आहेत पुणे येथील मोदीबागेत ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या वेळी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित आहेत, अशी देखील माहिती आहे.
नागपूर येथे खास विमानाने जावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ऐकल्यावर उत्तम जानकर आता शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. उत्तम जानकर 19 एप्रिल रोजी मेळाव्यात भूमिका जाहीर करणार आहेत.
उत्तम जानकरांचं मिशन विधानसभा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माळशिरसमधून उत्तम जानकर यांना निवडणूक लढवायची आहे. माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांची गरज आहे. तर, माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांना उत्तम जानकर यांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शरद पवारांसोबत काही चर्चा होऊन उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करणार का ते पाहावं लागेल.
दरम्यान, उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी खास विमान पाठवून नागपूर येथे चर्चा केली होती. त्या बैठकीनंतर जानकर यांनी आमदारकीचे आश्वासन दिले असल्याचं सांगितलं होतं. विधान परिषद किंवा विधानसभा, आता रान मोकळे तुम्ही मागाल ते देऊ असं आश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं उत्तम जानकर यांनी सांगितलं होतं. दरम्यान, उत्तम जानकर आज शरद पवारांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेऊन 19 एप्रिलला आपली राजकीय भूमिका ठरवणार आहेत. जानकर यांच्या निर्णयाचा माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो.
संबंधित बातम्या :