Mumbai Lok Sabha: मनसे-भाजप युतीच्या हालचाली; दक्षिण मुंबईत राज ठाकरेंचा उमेदवार?
दक्षिण मुंबईची जागा (Mumbai South Lok Sabha Constituency) मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच यासंदर्भात दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai Lok Sabha Election : मुंबई : एकीकडे महायुतीच्या जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) लोकसभेसाठीचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये. अशातच त्यात आता महायुतीची साथ मनसे (Maharashtra Navnirman Sena) देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसेसाठी एक ते दोन जागा सोडण्यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दक्षिण मुंबईची जागा (Mumbai South Lok Sabha Constituency) मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच यासंदर्भात दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मनसे महायुतीकडून आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) लढवणार का? आणि मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि मनसे यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे, मुंबईचा मध्यवर्ती भाग. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच दक्षिण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचं वजनही मोठं आहे. दक्षिण मुंबईतील मोठ्या प्रमाणातील मराठी व्होटबँक मनसेच्या बाजूनं आहे. गेल्या निवडणुकीतही मराठी व्होटबँक मनसेनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ठाकरेंना चितपत करण्यासाठी भाजपनं मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखली आहे.
ठाकरेंची सहानुभूती कमी करण्यासाठी भाजपची 'मनसे' खेळी
दक्षिण मुंबई मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील मतदार म्हणजे, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर दक्षिण मुंबईचा कौल ठाकरेंच्या बाजूनं झुकल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंना असलेली सहानुभूती जर मोडीत काढायची असेल, तर त्यासाठी ठाकरेच लागेल हे भाजपनं वेळीच ओळखलं आणि मनसेला साद घातली आहे.
दक्षिण मुंबईत ठाकरेंचंच पारडं जड
दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याच मतदारसंघातून भाजपच्या राहुल नार्वेकरांचंही नाव चर्चेत आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मुंबई जिल्ह्यातील तब्बल 6 विधानसभांचा समावेश होतो. वरळी विधानसभा मतदारसंघ, शिवडी विधानसभा मतदारसंघ, भायखळा विधानसभा मतदारसंघ, मलबार हिल विधानसभा मतदारसंघ, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ, कुलाबा विधानसभा मतदारसंघ या विधानसभांचा समावेश होतो. यातील दोन विधानसभा मतदारसंघ ठाकरेंकडे, दोन भाजपकडे आणि प्रत्येकी एक-एक शिंदे गट आणि काँग्रेसकडे आहे. अशातच दक्षिण मुंबईतील मराठी बहुल परिसर पाहता एकंदरीत ठाकरेंचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं मनसेला गळ घालत नवी रणनिती आखल्याचं पाहायला मिळत आहे. आता महायुतीची ही नवी खेळी किती यशस्वी होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दक्षिण मुंबईतील विधानसभा मतदारसंघांवर कोणाचं वर्चस्व?
- वरळी विधानसभा मतदारसंघ (ठाकरे गट)
- शिवडी विधानसभा मतदारसंघ (ठाकरे गट)
- भायखळा विधानसभा मतदारसंघ (शिंदे गट)
- मलबार हिल विधानसभा मतदारसंघ (भाजप)
- मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ (काँग्रेस)
- कुलाबा विधानसभा मतदारसंघ (भाजप)
महायुतीचं जागावाटप अद्याप रखडलेलंच, त्यात मनसेची एन्ट्री
अद्याप महायुतीचा लोकसभेसाठीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटपाच्या अनेक बैठका निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून जास्त जागांची मागणी होत आहे, त्यासाठी शिंदे आणि अजित पवारांवर दबाबतंत्रही वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. अशातच जर मनसेची एन्ट्री झाली, तर तिघांपैकी कोणाना कोणाची तरी जागा मनसेच्या खात्यात जाईल. आता मनसे जर महायुतीत आली आणि लोकसभा लढवली, तर त्यांच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :