Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीत मोठा तेढ, सांगली- भिवंडीच्या जागेवरुन काँग्रेस बॅकफूटवर
Lok Sabha Election: सांगली आणि भिवंडी दोन्ही काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असताना त्यावरती ठाकरे गट आणि शरद पवार गटाने अमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आता बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे
मुंबई : लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यात जागा वाटपांचा तिढा महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) अजूनही सुटलेला नाही. सांगली (Sangli Lok Sabha Election) आणि भिवंडीच्या (Bhiwandi Lok Sabha Election) जागेवरून महाविकास आघाडीत मोठी तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असताना त्यावरती ठाकरे गट आणि शरद पवार गटाने अमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आता बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे
सांगली लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि सर्वच पक्षांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. यासाठी सुरुवातीपासूनच काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली. मात्र महाराष्ट्रातील सांगली आणि भिवंडीची जागा ही महाविकास आघाडीत बिघाडी करते की काय? अशा चर्चा सुरु आहे. कारण सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने तर भिवंडीच्या जागेवर शरद पवार गटाने दावा केल्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे कमालीची उदासिनता काँग्रेस नेत्यांची पाहायला मिळत आहे. सांगली ही काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसच्या हातातून निसटून ठाकरे गटाच्या हातात जाताना पाहायला मिळत आहे.
सांगली मतदारसंघ (Sangli Lok Sabha constituency)
सांगली आणि नंदुरबार हे दोनच मतदार संघ आहेत की तब्बल 16 वेळा सर्वाधिक काँग्रेस निवडून आलेली आहे.1962 ते 2014 पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006 ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले2009ला प्रतीक पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. 2024 ला पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्या रूपाने हा काँग्रेसचा बालेकिल्ला सर करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र उद्धव ठाकरे बालेकिल्ल्यावरती आपला भगवा फडकवायला आग्रही असल्याच पाहायला मिळतंय
भिवंडी लोकसभा मतदारसंघ (Bhiwandi Lok Sabha constituency)
भिवंडी लोकसभेसाठी पहिली निवडणूक 1962 साली झाली त्यावेळी काँग्रेसचे यशवंतराव मुकने हे या मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले . त्यानंतर पुन्हा 1967 आणि 1971 मध्येही इथं काँग्रेसचाच खासदार निवडून आला. त्यावेळी सोनूभाऊ बसवंत आणि वैजीनाथ धामणकर यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण 1971 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. 2009 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि सुरेश तावरे हे काँग्रेसचे इथले चौथे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. मात्र 2014 च्या लाटेत कपिल पाटील निवडून आले आणि 2019 ला ही त्यांनी हा मतदारसंघ कायम ठेवला . मात्र आता महाविकास आघाडीत या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार यांनी दावा केलाय.
अशोक चव्हाणांमुळे सांगली आणि भिवंडी जागेवर तिढा
दोन्हीही पारंपरिक काँग्रेसचे मतदार संघ असताना ठाकरे आणि पवारांनी दावा केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे आता जो काही निर्णय होईल तो हायकमांड घेतील अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलीय. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या जागा वाटपात त्यावेळी अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे त्यांनी हा घोळ केल्याचा ठपका काँग्रेसचे नेते खाजगीत बोलताना सांगत आहेत. शिवसेनेची ताकद असलेल्या रामटेक , कोल्हापूर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेसने दावा केला त्यामुळे सांगली आणि भिवंडी जागेवर तिढा निर्माण झाल्याचं मत आहे.
काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी
या दोन्ही जागांवरती काँग्रेसचा दावा कायम असताना ठाकरे आणि पवारांनी परस्पर या जागांची घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता टाळता येत नाही. यावरून स्पष्ट होतय की जागा वाटपाच्या वाटाघाटीत कुठेतरी काँग्रेसचे नेते कमी पडलेत आणि त्यामुळे काँग्रेस आज महाविकास आघाडीमध्ये बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा :