Kirit Somiaya : रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट, भाजप नेते किरीट सोमय्यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...
Ravindra Waikar : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची शिवसेना खासदार क्लीन चीट प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई : शिवेसना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (Mumbai Police EOW) क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर केल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रवींद्र वायकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती.
मुंबई महापालिकेच्या तक्रारीच्या आधारे रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर, वायकरांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
रवींद्र वायकर काय म्हणाले?
सत्यमेव जयते, उशिरानं का होईना पण सत्याचाच विजय झालाय, असं खासदार रवींद्र वायकर म्हणाले. मी सुरूवातीपासून सांगत होतो, ते दोन वेगळे भूखंड होते. सर्व परवानग्या कायदेशीर मार्गानं मिळवल्या होत्या, कुठंही गैरप्रकार झालेला नाही. तपास यंत्रणांनाही मी हेच सांगितलं होतं, असं रवींद्र वायकर म्हणाले. आरोप करणा-यांनी ते कोणत्या होतूनं केले होते, त्यात आता मला जायचं नाही, असं रवींद्र वायकर किरीट सोमय्यांबद्दल प्रश्न विचारला असता म्हणाले.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी रवींद्र वायकर यांच्या क्लीन चीट बद्दल विचारल असता त्यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं त्यामुळे या विषयावरती मी काही बोलणार नाही, असं म्हटलं.
किरीट सोमय्यांनी गेल्या वर्षी काय म्हटलेलं?
किरीट सोमय्यांनी यापूर्वी प्रकरणी बोलताना म्हटलेलं की, खेळाचं मैदान उद्धव ठाकरेंनी आपल्या पार्टनरला फाईव्ह स्टार हॉटेल बांधायला दिलं. मुख्यमंत्री ते होते, महापालिका त्यांची होती असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेनी स्वत:च्या पार्टनरला फाईव्ह स्टार हॉटेल खेळाच्या मैदानावर बांधायला दिलं, असं सोमय्यांनी 16 जून 2023 रोजी म्हटलं होतं.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु असून त्यात ताबडतोब एफआयर नोंदवावा, रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असं सोमय्या म्हणाले होते.
संबंधित बातम्या :