Kiran Samant : मला खासदार बनवायला महायुती सक्षम, राजन साळवी शिंदेंसोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात मीच निवडणूक लढवणार; किरण सामंत यांचा इशारा
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : मी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवणार असून राजन साळवींनी आपल्या आमदाराकीची काळजी करावी असा टोला शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी लगावला.
रत्नागिरी : मला खासदार करायचे की नाही याचा निर्णय महायुती घेईल, मला खासदार बनवायला एकनाथ शिंदे, फडणवीस सक्षम असून राजन साळवींनी (Rajan Salvi) माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत (Kiran Samant) यांनी केलं आहे. राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला नाही तर त्यांच्या विरोधात लांजा विधानसभेतून मीच निवडणूक लढणार असाही इशारा किरण सामंत यांनी दिला.
किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे, त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल असे वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते. आता मात्र राजन साळवींच्या वक्तव्यावर किरण सामंत यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत आमदार राजन साळवी यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.
राजन साळवींच्या विरोधात निवडणूक लढवणार
भविष्यात लांजा राजापूर मतदारसंघ महाआघाडीकडून काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी असा सल्ला किरण सामंत यांनी दिला आहे. भविष्यात मी निवडणूक लढवली तर धनुष्यबाण याच चिन्हावर लढवेन असंही ते म्हणाले.
राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन असा इशारा देखील किरण सामंत यांनी राजन साळवी यांना दिला आहे.
राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी निवडणूक पार पडली. या ठिकाणी भाजपकडून नारायण राणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभेसाठी इच्छुक होते. पण शिवसेनेच्या वाट्याची ही जागा भाजपने घेतली आणि नारायण राणे यांना तिकीट दिलं. त्यामुळे किरण सामंत नाराज असल्याची चर्चा होती. परिणामी किरण सामंत हे मतदानाच्या दिवशी दिवसभर नॉट रिचेबल होते अशी चर्चा आहे.
ही बातमी वाचा: