Karnataka CM Swearing In Ceremony : सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
Karnataka CM Swearing In Ceremony : या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित आहे.
Karnataka CM Swearing In Ceremony : कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर कर्नाटकात सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित आहे. सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा बंगळुरुच्या कांतीराव स्टेडियमवर पार पडत आहे. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसने 135, भाजपने 66 आणि जेडीएसने 19 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील वाद अनेक दिवस सुरुच होता. मात्र, पक्षातील वरिष्ठांच्या झालेल्या बैठकीनंतर यावर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर आज अखेर शपथविधी सोहळा पार पडत आहे.
शपथविधीच्या कार्यक्रमात विरोधकांची एकजूट
यावेळी शपथविधीच्या कार्यक्रमात विरोधकांची एकजूट दिसून आली. तर या सोहळ्यात विरोधी पक्षांचे 10 हून अधिक महत्वाचे नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात महबूबा मुफ्ती (पीडीपी), नीतीश कुमार (जेडीयू), तेजस्वी यादव (आरेजेडी), डी राजा और सीताराम येचुरी (लेफ्ट), एमके स्टालिन (डीएमके), शरद पवार (एनसीपी), फारुक अब्दुल्ला (नेशनल कांग्रेस), कमल हासन (मक्कल नीधि माईम) उपस्थित आहे.
उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित आहेत. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: उद्ध ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. मात्र ठाकरे गटाकडून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.