वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे; कणकवली बॅनरची सर्वदूर चर्चा
Banner Outside Shiv Sena Office : कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी, याबाबत उलट सुलट चर्चा सध्या रंगली आहे.
सिंधुदुर्ग : वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर (Banner) कणकवलीत (Kankavali) लागला आहे. या बॅनरवर उदय सामंत (Uday Samant) आणि किरण सामंत (Kiran Samant) यांचा फोटो लावण्यात आले आहेत. कणकवली (Kankavali) शिवसेना शाखेबाहेर (Shiv Sena Shakha) लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी आहे, याबाबत उलट सुलट चर्चा सध्या रंगली आहे.
कणकवली बॅनरची सर्वदूर चर्चा
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली होती. सामंत बंधुंवर आरोप ही झाले होते. त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा रंगली असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे
सिंधुदुर्गात शिवसेना शाखेबाहेरील बॅनर सध्या सर्वांचं लक्ष वेधताना दिसत आहे. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोसोबत वाघ दाखवण्यात आला आहे. याशिवाय, बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे मोठ्या आकाराचे फोटो लावण्यात आले आहेत. यापुढे 'उदयजी सामंत आणि किरणजी सामंत यांच्या भावी राजकीय वाटचालीस लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा - शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी आणि शिवसैनिक' असा आशय लिहिण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत ठिणगी
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीत पहिली ठिणगी पडली ती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात. खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणेंनी शिवसेना शिंदे गटाने मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत. सामंतांचं वागणं आम्ही विसरणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.
निलेश राणेंचे उदय सामंतांवर आरोप
उदय सामंत पालकमंत्री असून देखील आम्हाला लीड देऊ शकले नाहीत, असा आरोप करत निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. निलेश राणेंनी म्हटलं की, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनसमध्ये आहोत. उदय सामंत लीड का देऊ शकले नाहीत ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत, असे आरोप निलेश राणेंनी उदय सामंतांवर केले.