Jaysingh Mohite Exclusive : आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, शरद पवारांची भेट घेताच मोहिते पाटलांचा यल्गार, माढाच नाही तर सोलापूर आणि बारामतीमध्येही गुलाल उधळण्याचा संकल्प
Jaysingh Mohite Patil On Madha Lok Sabha Election : रणजितदादांना मंत्री करतो म्हणून थांबलो असतो तर मोहिते पाटील गट संपला असता असं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलंय.
सोलापूर: देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आम्हाला खूप मदत केली आहे, त्यांनी जर आधीच सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना (Dhairyasheel Mohite Patil) निवडणुकीत उभंच राहू दिलं नसतं, पण आता वेळ गेली असं मोठं वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटील यांचं बंधू जयसिंग मोहिते पाटलांनी (Jaysingh Mohite Patil) केलंय. आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, आता माढाच (Madha Lok Sabha Election) नव्हे तर सोलापूर आणि बारामतीही जिंकणार असा यल्गारही त्यांनी व्यक्त केला. जयसिंह मोहिते पाटील हे 'एबीपी माझा'शी बोलत होते.
माढ्यामधून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर मोहिते पाटील गट नाराज झाला. माढ्यामधून इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आणि माढ्यातील राजकीय चक्रे वेगाने फिरू लागली. धैर्यशील मोहिते पाटील हेच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे निश्चित झालं आहे. त्यानंतर जयसिंह मोहिते पाटलांनी हे मत व्यक्त केलं.
रणजितदादांना मंत्री करण्यासाठी थांबलो असतो तर गट संपला असता
रणजितसिंह मोहिते पाटलांना मंत्री करण्यासाठी थांबलो असतो तर मोहिते पाटील गट संपला असता असं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला खूप मदत केली. शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तेथे फडणवीस यांनी मदत केली. सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षात परत केले, आता फक्त 55 कोटी राहिलेत. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला इडी-बिडीची भीती नाही."
देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना उभंच राहू दिलं नसतं, पण आता वेळ निघून गेली असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.
पाच आमदारांचा दाखला देऊन भाजपने चूक केली
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, "भाजपने रणजित निंबाळकर यांना उमेदवारी देताना पाच आमदार पाठीशी असल्याचं सांगितलं, पण ती त्यांनी चूक केली. आता माढा लोकसभेच्या गुलालासोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महविकास आघाडीचा असणार."
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे आता शरद पवार यांच्या पक्षाकडून माढा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. 14 एप्रिल रोजी ते पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत तर 16 एप्रिल रोजी ते लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
ही बातमी वाचा: