Jayant Patil: फडणवीसांनी फिल्डिंग लावलेल्या नेत्याचा जयंत पाटलांना फोन, म्हणाला, विजयदादांना पक्षात घेतलंत चांगलं केलंत
Maharashtra Politics: विजयदादा जुनं सोनं, भाजपला किंमत कळाली नाही, त्यासाठी शरद पवारांसारखा जातिवंत सोनारच लागतो, अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. माढ्यात शरद पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन.
अकलुज: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ अशी ओळख निर्माण झालेल्या माढ्यात वेगवान राजकीय हालचाली सुरु आहेत. भाजपचे माजी नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. यानिमित्ताने अकलुजमध्ये मोहिते-पाटील घराण्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाषण आणि एक कृती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात जयंत पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysingh Mohite Patil) यांच्या पाया पडले. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपच्यादृष्टीने प्रदेशाध्यक्षाची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे साहजिक या काळात प्रदेशाध्यक्षपदाचा भाव वधारलेला असतो. अशा काळात जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाया पडल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली. भाजपने मोहिते पाटील घराण्याच्या नाराजीला फारसे महत्त्व दिले नव्हते. मात्र, शरद पवार गटात मोहिते-पाटील घराण्याला आदराचे स्थान आहे, हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातही विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यातील ऋणानुबंध अधोरेखित केला. विजयदादा आणि शरद पवार कधीच वेगळे नव्हते. विजयदादांनी कधीच पक्ष सोडला नव्हता. विजयदादा हे जुने सोने आहे, पण भाजपला या सोन्याची किंमत ओळखता आली नाही. त्यासाठी शरद पवार यांच्यासारखा जातिवंत सोनारच लागतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
उत्तम जानकरांचा जयंत पाटील यांना फोन
माढा आणि सोलापूर भागात स्वत:ची ताकद राखून असलेले धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे भाजपसोबत जाणार की मोहिते-पाटलांची साथ देणार, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी आता माढ्याची सूत्रे हाती घेतल्याची माहिती आहे. याचाच एक भाग म्हणून फडणवीसांनी उत्तम जानकर यांना सोमवारी मुंबईत सागर बंगल्यावर बोलावून घेतल्याची माहिती आहे. जानकरांना मुंबईत आणण्यासाठी बारामतीला खास विमान पाठवण्यात येणार आहे. सागर बंगल्यावर चर्चा केल्यानंतर फडणवीस हे उत्तम जानकर यांना सोबत घेऊन थेट दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचीही चर्चा आहे.
मात्र, जयंत पाटील यांनी आपल्या आजच्या भाषणात वेगळाच दावा केला. रणजितसिंह मोहिते-पाटीलही आज वेगळ्या पक्षात नाहीत. उत्तम जानकर यांनी मला फोन करुन सांगितले की, तुम्ही विजयदादांना पक्षात घेऊन चांगले करत आहात. उत्तम जानकर आणि माझेही ठरले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
अकलूज महाराष्ट्रातील टर्निंग सेंटर ठरणार: जयंत पाटील
शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच जिव्हाळा आहे, म्हणूनच मध्यंतरी शरद पवार त्यांना भेटून गेले होते. त्यांचा 50 वर्षांचा ऋणानुबंध आहे. आज अकलूजपासून महाराष्ट्रात मोठा बदल होणार आहे. माढ्याचे विद्यमान खासदार कधी संसदेत बोलल्याचे मी ऐकले नाही. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हेच संसदेत बोलत असतात. शरद पवार यांचे जहाज आजवर कधीच बुडाले नाही. महाराष्ट्राने प्रत्येक संकटात हे जहाज तारले, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा