32 आमदार आणि 6-7 खासदार सोबत होते, तेव्हाच शिवसेनेचा प्रमुख झालो असतो; राज ठाकरेंनी गणित सांगितलं
Maharashtra Politics: शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचे घणाघाती भाषण. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. बाळासाहेबांशिवाय कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, असे मी ठरवले होते.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा प्रमुख होणार असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. मात्र, मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो नसतो का?, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. ते मंगळवारी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Guidpadwa Melava) बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष विलीन करण्याची शक्यता सपशेल फेटाळून लावली.
राज ठाकरे यांनी भाषणात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, मी शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी महाराष्ट्र दौरा सुरु केला तेव्हा माझ्या घरी 32 आमदार आणि 6-7 खासदार जमले होते. आपण एकत्र बाहेर पडू, असे ते सर्वजण म्हणत होते. मात्र, त्यानंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरु झाला. तेव्हा अनेकांना वाटलं तर मी काँग्रेसमध्ये जाईन. त्यामुळे शिवसेनेतील काहीजणांनी इकडे मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र, मी तेव्हाच सांगितलं होतं की, मला पक्ष फोडून कुठली गोष्ट करायची नाही. माझ्या मनात असा कोणताही विचार नाही. उद्या मी पक्षातून बाहेर पडलो तरी मी स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हे मी तेव्हाच ठरवले होते. तरीही मी त्यावेळी एकाला (उद्धव ठाकरे) संधी दिली होती. पण त्याला समजलंच नाही, असा अप्रत्यक्ष टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मनसेचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच येत नाही: राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत मनसे विलीन करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. राज ठाकरे यांनी म्हटले की, मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्याच पक्षाचा मी अध्यक्ष राहीन. तसेच माझ्यात आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा झाली, अशाही बातम्या ऐकायला मिळत आहेत. मी जागावाटपाच्या चर्चेला शेवटचा 1995 मध्ये बसलो होतो, या वाटाघाटी करण्याचा संयम माझ्यात नाही. मी मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे राज ठाकरे यांनी निक्षून सांगितले.
राज ठाकरे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय करणार?
राज ठाकरे यांनी 2014 साली पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर करत त्यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका 180 अंशांच्या कोनात बदलली होती. राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार केला होता. तेव्हादेखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. या निवडणुकीतील राज ठाकरे यांची 'लाव रे तो व्हिडिओ' प्रचार मोहीम लोकप्रिय झाली होती. त्यामुळे राज ठाकरे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा
मी फक्त मनसेचाच अध्यक्ष, कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण