Maharashtra Politics: मीपण शेतात जातो, पण प्रसारमाध्यमांमध्ये मित्र नसल्याने माझे फोटो छापून येत नाहीत, अजित पवारांचा टोला.
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस 1999 साली आमदार झाले. एकनाथ शिंदे 2004 साली आमदार झाले. विधानसभेत मी या दोघांना सिनियर आहे. मी 1990 च्या बॅचचा आमदार आहे. मात्र, सगळे पुढे गेले मी मागेच राहिलो, असे अजितदादांनी म्हटले.

ठाणे: भाजपसोबत येताना देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री करतो असे सांगितले असते तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन आला असतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर जोरदार राजकीय फटकेबाजी करताना आपल्या मनातील मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची सल जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधी मी आमदार झालो, पण दोघेही माझ्यामागून पुढे गेले. एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन येताना मुख्यमंत्री करु, असे आश्वासन देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मला तसे सांगितले असते तर, मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी जाऊन शेती करतात आणि त्याची छायाचित्रे अनेकदा प्रसिद्ध होतात. मीही माझ्या शेतात सकाळी जातो. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखे प्रसारमाध्यमांमध्ये मित्र नसल्याने माझी छायाचित्रे येत नाहीत, असा खोचक टोलाही यावेळी अजित पवार यांनी लगावला. परंतु, मी इतक्या वर्षात सत्ताधारी पक्षात काम करताना एकनाथ शिंदे यांच्यासारखा नागरिकांमध्ये मिसळून राहणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवारांनी सही केल्यानंतरही फाईल फिरुन पुन्हा त्यांच्यापाशीच येते: देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनीही राजकीय फटकेबाजी केली. अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे फाईलवर ते असे काही लिहतात की, फाईल फिरून त्यांच्यापर्यंतच आलीच पाहिजे. मी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री झालो. अजित पवार तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहात. पण, शिंदे यांचा रेकॉर्ड तुटणे शक्य नाही. सत्ताधारी पक्षातून बाहेर पडून त्यांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याची हिंमत दाखवली. त्यामुळे ते पुस्तकाचे नायक बनले, असा चिमटा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना काढला आहे.
गुलाबी बस अन् गुलाबी जॅकेट
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकदीने तयारी चालू केली आहे. या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फए जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला आजपासून (8 ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघआतून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. या यात्रेतील बसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
