शिट्ट्या अन् जल्लोष, जेसीबीने फुले उधळत राज ठाकरेंचं स्वागत, पण मनसे अध्यक्ष कारमधून उतरलेच नाहीत...
मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं धाराशिवमधील गोंधळानंतर हिंगोलीत जोरदार स्वागत झालंय.
Raj Thackeray in Hingoli: स्वागताला शिट्ट्या. कार्यकर्त्यांचा मोठा गराडा आणि जेसीबीवरून गुलाबाच्या फुलांचा वर्षाव. जवळपास सगळ्याच कार्यकर्त्यांच्या खिशातून मोबाईल बाहेर निघाला आणि हात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एन्ट्रीसाठी उंचावले. साहेबांना पाहण्याची चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये होती. उत्साही कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीमुळे शासकीय विश्रामगृहांच्या पायऱ्यांवरचं ग्रील तुटण्याची वेळ आली. तीन-चार महिला कार्यकर्त्यांनी ओवाळून स्वागत केलं. राज साहेबांचा विजय असो घोषणा सुरूच होत्या. मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं धाराशिवमधील गोंधळानंतर हिंगोलीत जोरदार स्वागत झालंय.
शासकीय विश्रामगृहाच्या रस्त्यावर दुतर्फा चार जेसीबीच्या पात्रात कार्यकर्ते एका हातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा धरत गुलाबांच्या फुलांची उधळण करत होते. या रस्त्यावर राज ठाकरेंच्या स्वागताचे फलक झळकवण्यात आले होते. रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. कोणत्याही क्षणी राज ठाकरेंची गाडी थांबेल आणि साहेब दिसतील आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र मनसे अध्यक्ष कारमधून बाहेर उतरलेच नाहीत. गाड्या थेट विश्रामगृहाकडे गेल्या.
आज हिंगोलीत मुक्काम नाही?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सध्या सुरू असून सोलापूर, लातूर, धाराशिवनंतर आज हिंगोलीत दाखल झाले असून आज परभणीत त्यांचा मुक्काम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात मराठा आरक्षण प्रश्न गंभीर स्वरूप घेत असताना सोलापुरात कशाला हवय आरक्षण? या वक्तव्यामुळे मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. धाराशिव दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये घुसत काही मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्यानंतर हिंगोलीत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर जोरदार टीका
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पश्चिम दौऱ्यावर असून त्यानी काल सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंवर जाेरदार टीका केली हाेती. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असे राज ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंचे नाव न घेता जरांगे म्हणाले, काल सोलापूरात एकजण बोलला होता, त्याच्या दौऱ्यात नुसते बोर्डच बोर्. माणसंच नव्हती. जर माझ्या मनात असते तर याला धाराशिवच्या बाहेर जाऊ दिले नसते. आपण संयमी आहे. दमानं घेतो. एकदा मागं लागलं की काय होतं हे तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहित आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो त्याची सुट्टी नाही. असं जरांगेंनी म्हटलं होतं. त्यामुळे आता हिंगोलीत ते याविषयी काही बोलतील का? याकडे लक्ष लागून आहे.
हेही वाचा: