Harshvardhan Patil: पोलिसांना वरुन कोणाचा तरी फोन येतो, तेवढा फोन बंद करा; फक्त तुमच्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतोय : हर्षवर्धन पाटील
Maharashtra Politics: कुठे अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्या. आम्हाला राष्ट्रवादीशी देणंघेणं नाही. हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांची इंदापूरच्या सभेत तुफान फटकेबाजी. अंकिता पाटील यांनी फडणवीसांसमोर तक्रारींचा पाढा वाचला
इंदापूर: इंदापूर तालुक्यात पोलीस त्यांचे काम चोखपणे करतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव आणला जातो. खोट्यानाट्या केस टाकल्या जातात. जर एखाद्याचं चुकलं असेल तर जरुर गुन्हा दाखल करावा. पण एखाद्या व्यक्तीला मारहाण होते आणि मारहाण करणारा व्यक्तीच अगोदर जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतो. अशावेळी पोलिसांना वरुन कोणाचा फोन येतो. वरुन येणारा हा फोन बंद करण्याचे काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करावे, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी केले. ते शुक्रवारी इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.
बारामती लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून पाठिंबा मिळावा, यासाठी शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील जुन्या गोष्टी विसरुन अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या मेळाव्यातील भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचा तोंडदेखला उल्लेख केला. तसेच अजित पवारांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर इंदापूरच्या जनतेने पाठिंबा द्यावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला.
इंदापूरमधील हा मेळावा अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील समेटाचे प्रतिक म्हणून पाहिला जात होता. मात्र, या मेळाव्यात भाषण करताना हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी फडणवीसांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंब्याचे आश्वासन मिळावे, अशीही मागणी हळूवारपणे रेटण्याचा प्रयत्न केला.
फडणवीसजी तुम्ही इंदापूरचं पालकत्त्व घ्या; हर्षवर्धन पाटलांची मागणी
हर्षवर्धन पाटील यांनी या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना इंदापूरचे पालकत्त्व स्वीकारुन या भागाचा विकास करण्याची विनंती केली. बारामतीत फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांची नेमकी किती ताकद आहे, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमचे चार-पाच प्रश्न आहेत. ग्रामपंचायतीमधील आमच्या कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही. सरपंच अवैध ठरवले जातात. आम्ही गावांमध्ये मतं मागायला जातो, तेव्हा लोकांना काय सांगणार? इंदापूर तालुक्यात भ्रष्टाचार वाढला आहे. या सगळ्याचा महायुतीवर कुठेतरी परिणाम होत असतो, याची दखल देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
अजित पवारांनी दुखावलेले हर्षवर्धन पाटील, शिवतारे, तावरे, जाचक, कुल, थोपटे कुणाला साथ देणार?