Gopichand Padalkar: सर्वधर्म समभाव ही अफूची गोळी, मुस्लिमांनी जास्त मुलं जन्माला घालण्यावर बंदी घालायला हवी: गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar in Solapur: जो हात हिंदुत्त्वावर उठेल तो कापून टाकू. हम दो हमारे दो, हे धर्म ग्रंथात असल्यासारखे आपण पाळतोय. मुस्लीम समाजातील लोक हा विचार करतात का, गोपीचंद पडळकर

सोलापूर: सर्वधर्म समभाव ही अफूची गोळी आहे. 'हम दो हमारे दो', हे धर्मग्रंथात असल्यासारखे आपण पाळतोय आणि आपल्या मुलांना नोकरी लावण्याचा विचार करतोय. पण तिकडे मुसलमान 'हम दो हमारे दस', असा विचार करतात. त्यासाठी देशात मुस्लिमांसाठी जनननियंत्रण (Muslim Birth Rate) कायदा आणला पाहिजे. आम्ही आधीच 'हम दो, हमारे दो' आहोत, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. ते गुरुवारी सोलापूरमध्ये (Solapur News) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भाषण केले.
विधानसभा निवडणूक होऊन पाच महिने तर लोकसभेला 11 महिने झाले आहेत. दोन्हीकडे भाजप सरकार आहे तरी आम्ही विराट हिंदू सभा घेत आहोत. कारण हिंदुत्व हा राजकारणाचा विषय नाही, हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. जो हात हिंदुत्वावर उठेल तो हात कापून टाकण्यासाठी आम्ही इथे आलोय, असे गोपीचंद पडळकर यांनी या सभेत म्हटले.
राज्यातील बऱ्याच लोकांना औरंगाजेबचा पुळका आला आहे. औरंगजेब तुमचा बाप आहे की आजा? छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना रात्रीचा दिवस केला. अनेक मावळ्यांनी प्राण गमावले. आता तो हिंदवी स्वराज्य स्वप्न पूर्ण पुढे नेताना जरं कोणी औरंगजेब आडवा आला तर त्याला तुडवून पुढे जायला पाहिजे. औरंगजेब कबरीत असला तरी त्याची पिलावळ बाहेर आहे, त्यांना गाडण्याची गरज आहे. भारतात राहून 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ घालायची वेळ आली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
लव्ह जिहादकडे लक्ष द्या, पालकांनी मुलींवर लक्ष ठेवावं, गोपीचंद पडळकरांचं आवाहन
काँग्रेस पक्ष मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळत बसला आहे. लोकसभा निवडणुकीचा मालेगावचा निकाल बघितला पाहिजे. पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी नाहीत, तेवढे गद्दार भारतात आहेत. लव्ह जिहादचे प्रकार रोज सुरु आहेत. हा विषय अत्यंत काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. प्रत्येक मुलीच्या पालकाने तिचे मित्र कोण आहेत, फेसबुकवर कोण आहेत हे सगळं तपासलं पाहिजे. एका मुलीला फसवण्यासाठी दहा-दहा जण प्रयत्न करत आहेत. ब्राह्मण, मराठा, मागासवर्गीय सर्व मुलींना फसवण्यासाठी यांचे रेट कार्ड ठरलेले आहेत. मुलींनी पण अक्कल नसल्यासारखे वागू नका. काळजीपूर्वक पाहा. सोलापुरात आताच एक प्रकार घडलाय. एका कर्मचाऱ्याने आठ मुलींना फसवलंय, त्यांच्यावर अत्याचार केलेत. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये नक्की येणार आहे. आज हिंदू मुलांची नावं काय आहेत? कयान, क्रिश कसली नावं आहेत ही? तुम्ही पुढरलेला आहेत, पण किमान नावं तरी नीट ठेवा. संभाजी, शिवाजी, अहिल्या अशी नावं ठेवा, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
पाकिस्तानपेक्षा जास्त गद्दार भारतात आहेत: गोपीचंद पडळकर
संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत, त्यांना काय म्हणत होते, धर्म बदला, पण किती ही हाल झाले तरी त्यांनी धर्म बदलला नाही, हे आपले आदर्श आहेत. जरं कोणी लाचेपोटी असलं करत असेल तर त्यांना समजवा, त्यांची घरवापसी करा. माझ्या हातात एक फाईल आहे, या मैंदर्गी गावात एवढ्या सरकारी जमीन यांनी ढापल्यात. मी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो, तात्काळ कारवाई करा.
अशा सर्व अनधिकृत जमिनीवर बुलडोजर फिरवलं पाहिजे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खमके आहेत. लँड जिहाद हा मोठा विषय सध्या महाराष्ट्रमध्ये झालेला आहे. जेव्हा धर्माचा विषय असेल तेव्हा जात बाजूला ठेवून मी धर्मासाठी पुढे होईन. देशात घुसखोरांची संख्या वाढली आहे. दहा कोटी घुसखोर देशात राहत आहेत. तुम्ही कुठल्या लॉजवर जा, आधी तिथं आधार कार्ड मागितलं जातं मग तुम्हाला रूम दिली जाते. या देशात राहायला तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? आता गल्लीत घुसून कोंबिग ऑपरेशन केलं पाहिजे. हे रोहिंग्या बांगलादेशी लोकांना ढुंगणावर लाथ घालायाला पाहिजे. पाकिस्तानपेक्षा जास्त गद्दार भारतात राहत आहेत, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
आणखी वाचा
मी 22 व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो, मला चोऱ्या-माऱ्या करायची गरज नाही; गोपीचंद पळडकरांचा पलटवार
























