CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Girish Mahajan on Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Maharashtra Assembly Elections 2024) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना फोर्स वनची सुरक्षा देण्यात आली असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच वाढवली याचा मला धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांना धोका आहे का? असे त्यांनी म्हटले. आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.
गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर पलटवार
गिरीश महाजन म्हणाले की, गुप्तचर विभाग आणि आयबीकडून गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यात यावी अशा सूचना मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत उद्या पंतप्रधान यांना झेड प्लस सुरक्षा का दिली अस काहीही बोलू शकतील, त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही, असे टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. उद्या उद्धव ठाकरे यांना सुरक्षा यंत्रणा दिली, असे विचारले तर आणि सुरक्षा कमी केली तर संजय राऊत किती गोंधळ घालतात, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस यांना कोणापासून धोका आहे? त्यांच्या सुरक्षेत इतकी वाढ का करण्यात आली आहे? महाराष्ट्र आणि सागर बंगल्यावर इस्रायल किंवा युक्रेन हल्ला करणार आहे का? देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना कोणापासून धोका आहे? त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमुळे धोका आहे का? जे फोर्स वन पथक दहशतवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आले होते, त्या पथकातील जवान देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी सागर बंगल्यावर तैनात करण्यात आले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महायुतीचे सरकार स्पष्ट बहुमताने येणार : गिरीश महाजन
दरम्यान, दिवाळीच्या दिवसात आपण प्रचारात फिरत असल्याने घरात कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. बायको मुले नाराज झाले आहेत, पण निवडणूक आणि दिवाळी सण एकाच वेळी आली आहे. या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा महायुतीचे सरकार पुन्हा स्पष्ट बहुमताने येईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी सामंजस्याने आम्ही हा प्रश्न सोडवू, एक मताने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा