(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गजानन कीर्तिकरांवर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होणार? आजच नोटीस धाडणार, गजाभाऊ आता काय करणार?
Gajanan Kirtikar Anti Disciplinary Action : शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे गजानन कीर्तिकरांविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Gajanan Kirtikar : मुंबई : मुंबईतले (Mumbai News) शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. कीर्तिकरांनी मुलगा आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्याबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत (Shiv Sena) नाराजी आहे. शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. टर्निंग पॉईंटला आपल्या मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते, असं गजानन कीर्तिकरांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं.
गजानन कीर्तिकरांनी आपला मुलगा आणि मुंबई उत्तर पश्चिममधील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांबाबत वक्तव्य केलं होतं. शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून गजानन कीर्तिकरांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे भाजप नेते प्रविण दरेकर यांनी गजानन कीर्तिकरांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे गजानन कीर्तिकरांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
शिस्तभंगाची कारवाई काय होणार?
शिवसेनेत जर अशाप्रकारे एखाद्या नेत्याबाबतचा तक्रार अर्ज जर शिस्तभंग कमिटीकडे गेला, तर त्या तक्रार अर्जावर विचार केला जातो. त्यानंतर ते पक्षप्रमुख आहेत, किंवा पक्षाच्या मुख्य नेत्याशी या प्रकरणी सल्लामसलत करुन संबंधित नेत्याला एक नोटीस बजावली जाते. ही नोटीस म्हणजे, एक कारणे दाखवा नोटीस असते. ज्या नेत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्या नेत्याला एका ठराविक वेळमर्यादेत या नोटीशीला उत्तर द्यावं लागतं. जर त्या संबंधित नेत्यानं नोटीशीला उत्तर दिलं, तर त्या नोटीशीत नमूद करण्यात आलेलं उत्तर समाधानकारक आहे की नाही? हे तपासलं जातं. जर हे उत्तर समाधानकारक असेल तर संबंधित नेत्यावर कारवाई होत नाही. पण जर हे उत्तर समाधानकारक नसेल तर मात्र संबंधित नेत्याला पक्षाच्या शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. ही कारवाई काही वर्षांसाठी किंवा काही महिन्यांसाठी असते. तर पक्षातून हकालपट्टी करण्याची किंवा पक्षातून निलंबित करण्याची कारवाई असते. त्यामुळे जर गजानन कीर्तिकरांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली तर त्यांची हकालपट्टी होऊ शकते किंवा त्यांचं निलंबनही होऊ शकतं.
दरम्यान, अद्याप शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीनं अद्याप कोणतीही नोटीस खासदार गजानन कीर्तिकरांना पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे कदाचित आज ही नोटीस गजानन कीर्तिकरांना धाडली जाऊ शकते. त्यानंतर गजानन कीर्तिकर या नोटीशीला काय उत्तर देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : Gajanan Kirtikar on Shiv Sena : गजानन कीर्तिकर यांची अडचण वाढण्याची शक्यता, शिस्तभंगाची कारवाई होणार