माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Dr Manmohan Singh Passes Away : मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा मागितली होती.
Dr Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन (Dr Manmohan Singh Passes Away) झाले. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारक उभारावं, अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जात होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 28 डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितली होती. आता मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधले जाणार आहे. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीनही मिळू शकली नाही. हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी म्हटले. तर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणी स्मारक बांधले जावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. यानंतर केंद्र सरकारकडून मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करून घेतले जावेत. त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागेल. विश्वस्त मंडळ स्थापन करून मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारले जाईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
दरम्यान, आज शनिवारी सकाळी 8 वाजता मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. तेथे 8.30 ते 9.30 दरम्यान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजता काँग्रेस मुख्यालयातून सुरू होणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर नवी दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.
1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर ड. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.
आणखी वाचा